कणकवलीत शिवसेनेचा रास्ता रोको
By admin | Published: June 10, 2017 12:22 AM2017-06-10T00:22:26+5:302017-06-10T00:22:26+5:30
कणकवलीत शिवसेनेचा रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने कणकवलीतील पटवर्धन चौकात शुक्रवारी ११.३0 च्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३0 शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या गाडीतून पोलिस स्थानकात नेले. यावेळी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कर्जमाफी बळिराजाची जबाबदारी सरकारची, शेतकऱ्यांंना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शिवसेनेचा विजय असो, अशा घोषणा देत शिवसैनिक मुंबई-गोवा महामार्गावरून पटवर्धन चौकात दाखल झाले. कणकवलीतील शिवसेना शाखेपासून शिवसैनिकांनी मोर्चा काढून शेतकऱ्यांप्रति असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक शिवसैनिकांच्या हातात घोषणांचे फलक होते. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता.
यावेळी महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शाखेपासून महामार्गावरून मोर्चा काढून पटवर्धन चौकात ठिय्या आंदोलन केले. बंदोबस्तासाठी जलद कृती दलाची तुकडी मागवण्यात आली होती.
सकाळी ११ वाजता रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. त्यामुळे सकाळी १0 वाजल्यापासूनच पोलीस पटवर्धन चौकात दाखल झाले. काही पोलीस मोर्चासोबत होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता आंदोलन शांततेत पार पडले. पटवर्धन चौकात महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. महामार्गावर ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस गाडीत बसवून पोलीस स्थानकात नेले व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी महामार्गावर ठिय्या मांडलेले आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत, नारायण भिसे, राजू राठोड, हर्षद गावडे, राजेंद्र शेट्ये, शांताराम राणे, डॉ. तुळशीराम रावराणे, फय्याज महम्मद खान, मनोहर गुरव, दीपक राऊत, समीर परब, रिमेश चव्हाण, सतीश परब, चंद्रकांत परब, रूपेश आमडोस्कर, अरविंद राणे, हरिश्चंद्र कांदळकर, प्रथमेश परब, अनिल सावंत, जितेंद्र कांबळे, महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडोलकर, तेजल लिंग्रज, प्रतीक्षा साटम, संजना कोलते, वैभवी पाटकर, श्यामल म्हाडगूत, संजीवनी पवार आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून समज देऊन सोडून देण्यात आले.