कोकण राज्यासाठी २९ नोव्हेंबरला रास्ता रोको
By admin | Published: October 27, 2016 10:33 PM2016-10-27T22:33:10+5:302016-10-27T23:27:33+5:30
महामार्गावर उतरणार कोकणी जनता : लाखोंच्या संख्येने सहभागाचे नाटेकर यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीसाठी मुंबई-गोवा महामार्गावरील मुंबई ते गोवा या महामार्गावर २७ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई या सहा जिल्ह्यातील कोकणी नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना अध्यक्ष महेंद्र नाटेकर यांनी केले आहे.
आर्थिक मागास असलेल्या कोकणात पूर्वी शासकीय, निमशासकीय ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना दिल्या जात होत्या. परंतु आता कोकण शैक्षणिक, औद्योगिक, शेती, बागायती आदींमध्ये मागास असूनही ९० टक्के घाटमाथ्यावरील बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या जातात. १०० टक्के अधिकारीवर्ग घाटमाथ्यावरचाच आहे. लाखो रुपयांनी नोकऱ्यांची खरेदी-विक्री होते. त्यामुळे कोकणी तरुण देशोधडीला लागला आहे. नोकरी मिळेल तिकडे तो पळतो. परिणामी आईवडील, आजी-आजोबा निराधार होतात. हजारोंनी एकर जमीन ओस पडत आहे.
९० टक्के नोकऱ्या व १०० टक्के अधिकारीवर्ग घाटमाथ्यावरचा असल्याने कोकणावर अन्याय होत आहे. त्यामुळेच स्वतंत्र कोकण निर्मितीसाठी स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघटनेने ‘रास्ता रोको’चा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने रिझर्व्ह बँक, जागतिक बँक, नाबार्डकडून तीन लाख ४० हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. हे सर्व कर्ज त्यांनी कोकण वगळता अन्य महाराष्ट्रावर खर्च केले. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसावर ३६ हजार रुपयांचे कर्ज आहे. ते विविध वस्तूंच्या माध्यमातून कर लावून वसूल केले जात आहे. परंतु हा खर्च कोकणावर न करताच कोकणातील माणसाकडून वसूल केला जात आहे. ज्यावेळी राज्य शासन अन्याय करते तेव्हा राज्य शासनाविरुद्ध दंड थोपटून केंद्रशासनाने वेगळी मागणी करणे अपरिहार्य ठरते.
महामार्ग चौपदरीकरण, उद्योगधंदे, पर्यटन विकास, रेल्वे किनारपट्टीवरून गेली. सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था आल्या तरी यामध्ये अन्य राज्यातील लोकांना नोकरी मिळाली तर कोकणला उपयोग काय? असा प्रश्न करीत प्रा. नाटेकर यांनी केला. (प्रतिनिधी)