रूग्णांची हेळसांड थांबवा
By admin | Published: October 21, 2015 09:35 PM2015-10-21T21:35:20+5:302015-10-21T21:35:20+5:30
सतीश सावंत : इतर जिल्ह्यातील डॉक्टरांची सेवा घ्या
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत रुग्णांना चांगली सेवा दिली जात आहे. मात्र, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे पाहता कणकवलीतून ओरोस जिल्हा रुग्णालयात व तेथून कोल्हापूर व गोवा येथे रुग्णांची हलवाहलव करून हेळसांड केली जात असल्याची माहिती सदस्य सतीश सावंत व मधुसूदन बांदिवडेकर यांनी सभागृहात दिली. त्यामुळे डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी इतर जिल्ह्यातील डॉक्टरांच्या सेवा या जिल्ह्यात वर्ग करून कामगिरीवर त्यांची नियुक्ती करावी असा ठराव यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात बुधवारी पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, संजय बोंबडी, स्नेहलता चोरगे, समिती सदस्य सतीश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, श्रावणी नाईक, अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
या स्थायी समिती सभेत तुरडाळीचे भाव गगनाला भिडले असून अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या युती सरकारने दिवाळीत तरी तूरडाळ व तेल रेशनकार्डावर उपलब्ध करून द्यावे अशी सूचना सदस्य सतीश सावंत यांनी मांडली. या विषयावर गरमागरम चर्चा करण्यात आली. या सूचनेनुसार एकमताने ठराव संमत करण्यात आला.
जिल्ह्याचे सुपुत्र दीपक सावंत यांच्याकडे आरोग्यमंत्रीपद आहे. मात्र जिल्ह्याचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून काहीही झाले नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत बदल घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या पहिल्या दौऱ्यात दिले होते. मात्र, त्यात काहीच झाले नाही. नुसती पोकळ आश्वासने देण्याचे काम त्यांनी केले. जिल्ह्यात सरकारी दवाखाने डॉक्टराविना ओस पडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्यांना नाहक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून डॉक्टरांच्या सेवा वर्ग करून सिंधुदुर्गातील सरकारी दवाखान्यांचे आरोग्य सुधारावे अशी मागणी करत ठराव घेण्यात आला.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत ५५ कोटी रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी सुमारे २५ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, बिले देण्यासाठी केवळ अडीचकोटी रुपये उपलब्ध झाल्याने उर्वरीत कामे ठप्प झाली आहेत अशी माहिती पंतप्रधान ग्रामसडक विभागाकडून देण्यात आली.
जनता विद्यालय तळवडे, सावंतवाडी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आपल्या अधिकारात शालेय पोषण आहारात कमतरता करतात. त्यामुळे त्यांच्याकडे १४५० किलो धान्य जास्त आढळून आले आहे.
नियमानुसार ते दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर कारवाई काय करणार असा प्रश्न सतीश सावंत यांनी उपस्थित केला. त्या मुख्याध्यापकावर कारवाई ही झालीच पाहिजे यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागवावे असे सभागृहात सर्वानुमते ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)
१७ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया : साळे यांची माहिती
जिल्ह्यातील ४७ दुर्धर आजारी मुलांपैकी १७ विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे तर सहा विद्यार्थी शस्त्रक्रिया करून घेण्यास इच्छुक नाहीत. २० विद्यार्थी जोखमीचे असल्याने त्यांच्या शस्त्रक्रिया तहकूब ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी दिली.
प्राथमिक शाळांच्या आॅनलाईन बिल प्रक्रियेत जिल्ह्यातील १४४३ गावांपैकी ११६५ शाळांची शालार्थ वेतनाची बिले झालेली आहेत. त्यात सावंतवाडी तालुक्याचा पहिला क्रमांक लागत असून त्या तालुक्यातील शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याच्या वेतनास मंजुरी मिळाली आहे. इतर तालुक्यांची मंजुरी प्रक्रिया सुरु आहे.
वालावल-हुमरमळा येथे १३ व्या वित्त आयोगातून बांधलेल्या एस. टी. निवारा शेडला जमीन मालकाचे नाव लावण्याच्या पार्श्वभूमीवर सभागृहात एकच हंगामा झाला. शासकीय निधीतून खर्ची पडून उभारलेल्या वास्तूला खासगी व्यक्तीचे नाव देता येत नसल्याने त्या निवारा शेडला त्या मालकाचे नाव लावू नये असे सर्वानुमते यावेळी निश्चित करण्यात आले आहे.