कामगारांची लुबाडणूक थांबवा
By admin | Published: January 23, 2015 09:12 PM2015-01-23T21:12:29+5:302015-01-23T23:38:18+5:30
प्रसाद गावडे : धनादेश वाटपाबाबत दिशाभूल करणाऱ्या संघटनेवर कारवाई करा
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदीत जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना परजिल्ह्यातील निवारा बांधकाम कामगार संघटनेने विविध लाभाचे पाच लाख रुपयांचे धनादेश वाटप केल्याच्या खोट्या बातम्या देऊन कामगारांची दिशाभूल केली आहे. या संघटनेने केवळ एक लाख आठ हजार रकमेचे धनादेश वाटप केले असून, कामगारांची लुबाडणूक करणाऱ्या या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.परजिल्ह्यातील निवारा बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी जिल्ह्यातील कामगारांना खोटी माहिती देऊन आमिषे दाखवत असल्याचा आरोपही स्वाभिमानी कामगार संघटनेने केला आहे.
कामगारांना पाच लाख रुपयांचे धनादेश वितरित केल्याची खोटी बातमी निवारा बांधकाम कामगार संघटनेने देऊन कामगारांची दिशाभूल केली आहे. केवळ आणि केवळ कामगारांना लुबाडण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे. प्रत्यक्षात या संघटनेने ३५ हजार रकमेचा एक धनादेश, १० हजारांचे दोन, २५ हजारांचा एक, १५ हजारांचा एक, पाच हजारांचे दोन आणि ३०५० रकमेचा एक असे एकूण एक लाख आठ हजार रुपयांचे धनादेश कामगारांना वितरित करण्यात आले. मात्र, प्रसिद्धी देताना पाच लाख रुपयांचे धनादेश वितरित केल्याची खोटी माहिती या संघटनेने दिली आहे. कामगारांची दिशाभूल करणारी बाब असून, या संघटनेचा निव्वळ मूर्खपणाच असल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
निवारा बांधकाम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा
निवारा बांधकाम संघटनेच्या परजिल्ह्यातील स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या अशा खोट्या बातम्यांवर बांधकाम कामगारांनी विश्वास न ठेवता त्यांच्या आमिषांना बळी पडू नये. तसेच या दिशाभूल करणाऱ्या संघटनेची जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी वेळीच दखल घेत संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गावडे यांनी केली आहे.
१५९ कामगारांना आठ लाखांची मदत मंजूर
भारतीय मजदूर संघ व स्वाभिमानी कामगार संघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नातून १५९ कामगारांना सुमारे आठ लाख एवढी लाभार्थी रक्कम मंजूर झाली असून, या धनादेशाचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे.