ओसरगाव टोलनाक्यावरील टोलवसुली बंद, सिंधुदुर्गवासीयांच्या विरोधामुळे नव्हे तर...
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 14, 2023 11:50 AM2023-06-14T11:50:24+5:302023-06-14T11:50:43+5:30
कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथे अखेर कोरल असोसिएट राजस्थान या कंपनीकडून सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली होती. सिंधुदुर्गवासीयांचा विरोध जुगारून ही टोल वसुली पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आली आहे. मात्र,कंपनीच्या सूचनेनुसार टोल वसुली थाबवली. टोल वसुली करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळेच ही टोल वसुली बंद करण्यात येत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक रोहन डांगे यांनी दिली.
काही दिवसानंतर ही टोल वसुली पुन्हा सुरु करण्यात येईल. सिंधुदुर्ग पासिंग वाहनाबाबत कोणतीही सूचना आलेली नाही. हा निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळविण्यात येईल. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गवासीयांना टोलमुक्ती मिळाली पाहिजे अशी भूमिका टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीने घेतली होती. त्यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करु अशी भूमिका समितीच्या बैठकीत घेण्यात आली होती. मात्र सिंधुदुर्गवासीयांचा विरोध जुगारून ही टोल वसुली आज, सकाळपासून पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आली होती.