वादळाने वीज कंपनीचे मोठे नुकसान, अनेक घरांवर झाडे कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:18 PM2020-05-15T17:18:49+5:302020-05-15T17:21:32+5:30
सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाचा फटका सह्याद्री पट्ट्याला बसला असून ग्रामस्थांच्या घरांवर तसेच मांगरांवर झाडे कोसळून मोठी हानी झाली आहे. तर वीज वितरण कंपनीचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाचा फटका सह्याद्री पट्ट्याला बसला असून ग्रामस्थांच्या घरांवर तसेच मांगरांवर झाडे कोसळून मोठी हानी झाली आहे. तर वीज वितरण कंपनीचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शहरासह अनेक गावातील विद्युत पुरवठा अद्यापपर्यंत सुरळीत झालेला नव्हता. विद्युत विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते.
वळवाच्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडविला.
सोसाट्याच्या वाऱ्यासह काहीकाळ कोसळलेल्या या पावसाच्या वादळी तडाख्याने सावंतवाडी तालुक्याला नुकसानी पोहोचविली. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागांमध्ये नुकसानीच्या घटना घडल्या. रस्त्यावर झाडे उन्मळून पडली तर घरे, गोठे, दुकाने आदींची मोठी नुकसानी झाली.
सह्याद्री पट्ट्यातील सांगेली, कलंबिस्त, सावरवाड, माडखोल, कारीवडे, पेडवेवाडी आदी गावांमध्ये या वादळाचा मोठा फटका बसला. केळी, आंबा, काजूच्या बागांही यामध्ये उद्ध्वस्त झाल्या. विद्युत वाहिन्यांवर भलेमोठे झाडे कोसळल्याने विद्युत खांब मोडून पडले. यामुळे सह्याद्री पट्ट्यातील वीजपुरवठाही खंडित झाला. काही काळासाठी झालेल्या या वादळी तडाख्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले.
सावरवाड येथील दाजी कुडतरकर यांच्या दुकानाचे तर बाबू वर्धन यांच्या गोठ्याचे छप्पर उडाले तर मनोहर मेस्त्री, शांताराम कुडतरकर यांच्या घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले. तेथीलच उत्तम कुडतरकर, संतोष ठाकर व मोहन कुडतरकर यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर कारिवडे येथील प्रदीप नाईक यांच्या घरावर झाड कोसळून पूर्णत: नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील माणसे थोडक्यात बचावली .
सायंकाळी अचानक बसलेल्या या वादळाच्या तडाख्याने ग्रामस्थांची एकच धांदल उडाली. तर डोळ्यादेखतच झालेल्या घरांच्या नुकसानीमुळे अनेकांना अश्रू अनावर झाले. पावसाआधीच बसलेल्या या फटक्यामुळे अनेकजण आर्थिक संकटात सापडले. वीज वितरण कंपनीचे माडखोल विभागामध्ये तब्बल २१ विद्युत खांब वादळाच्या तडाख्यात मोडून पडले तर अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले.
तालुक्यात असनिये, सावंतवाडी शहर व इतर ग्रामीण भागातील नुकसान लक्षात घेता वीज वितरण कंपनीचे ५१ विद्युत खांब पडून नुकसान झाले. यामध्ये मेन लाईनचे १६ तर छोट्या लाईनचे खांब तुटून पडले. सावंतवाडी शहरातही बाहेरचावाडा येथे वीज लाईनवर झाड पडल्याने लाईन तुटून नुकसान झाले.