दोडामार्गला वादळाचा तडाखा
By admin | Published: May 12, 2017 10:50 PM2017-05-12T22:50:28+5:302017-05-12T22:50:28+5:30
दोडामार्गला वादळाचा तडाखा
लोकमत न्यूज नेटवर्क
दोडामार्ग / कणकवली : वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट करीत कोसळलेल्या अवकाळी पावसाने शुक्रवारी पुन्हा एकदा दोडामार्ग तालुक्याला चांगलाच तडाखा दिला. घोटगे-परमे पंचक्रोशीत हजारो केळींची झाडे जमीनदोस्त झाली, तर रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडून वाहतूक ठप्प झाली.
झरेबांबर, साटेली भेडशी, वायंगणतड परिसरात घराच्या छपरावरील कौले व पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले. तर कणकवली तालुक्यातील पियाळी गावठण येथे सूर्यकांत कुडतरकर यांच्या शेतातील ऊस भरणी करीत असताना अचानक विज पडल्याने वाघेरी येथील प्रभाकांत मोहन वाघेरकर यांचा एक बैल जागीच ठार झाला, तर दूसरा बैल जखमी झाला असून, ते स्वत:ही जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. प्रभाकांत वाघेरकर यांच्यावर फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना कणकवली येथे अधिक उपचारासाठी आणण्यात आले .
कणकवली शहरासह जिल्"ात ठिकठिकाणी ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. वीज चमकण्याचे प्रमाणही जास्त होते. वैभववाडी, फोंडा, तळेरे, नांदगाव, कासार्डे परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील विविध भागात वादळाने झाडे कोसळली होती.
कणकवली तालुक्यात शुक्रवारी विजेच्या कड़कडाटासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वाघेरी येथील प्रभाकांत वाघेरकर (३५) हे पियाळी गावठण येथे ऊस भरणीचे काम करीत होते. यावेळी अचानक पडलेल्या विजेमुळे त्यांचा एक बैल जागीच ठार झाला. तर दूसरा बैल जखमी झाला आहे. तसेच वाघेरकर हे सुध्दा जखमी झाले आहेत. या घटनेबाबत माहिती समजताच ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाघेरकर यांना तत्काळ फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनास्थळी मंडळ अधिकारी ममता तांबे यांनी भेट देवून पंचनामा केला.तसेच माजी उपसभापती संतोष कानडे, तुळशीदास रावराणे, बबन नारकर, दामोदर नारकर, महेंद्र राणे, पोलिसपाटील सुनील पवार यांनीही भेट देवून पहाणी केली. वाघेरकर यांची सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बैलजोडीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. या घटनेमुळे वाघेरी पंचक्रोशित हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच तहसीलदार गणेश महाडिक यांनी सायंकाळी फोंडाघाट येथे जावून वाघेरकर यांची विचारपुस केली. तसेच घटनेबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत परमेश्वर फड उपस्थित होते.