वादळी वाऱ्याने तळेबाजार, वरेरी परिसरातील बागायतदारांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 12:53 PM2020-05-08T12:53:56+5:302020-05-08T12:55:31+5:30
देवगडमध्ये आठ दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळाचा फटका तळेबाजार, वरेरी परिसरातील बागायतदारांना बसला आहे.
देवगड : देवगडमध्ये आठ दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळाचा फटका तळेबाजार, वरेरी परिसरातील बागायतदारांना बसला आहे.
यात संतोष परब यांच्या बागेतील ५५ आंबा कलमे वादळी वाऱ्याने उन्मळून व मोडून पडल्याने सुमारे ९ लाखांचे नुकसान झाले आहे. देवगडमध्ये २९ रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाचा फटका आंबा बागायतदार व मत्स्यव्यावसायिकांना बसला होता.
सायंकाळी अर्ध्या तासात झालेल्या चक्रीवादळाने वरेरी गावातील बागायतदारांचे नुकसान झाले. संतोष शंकर परब यांच्या वरेरी धरणेवाडी येथील आंबा बागेतील ५५ कलमे वादळी वाऱ्याने अक्षरश: उन्मळून पडली.
यामध्ये कलमांवरील सुमारे २५० ते ३०० पेटी आंबाही पडून गेला. त्यामुळे बागायतदार परब यांचे सुमारे ९ लाखांचे नुकसान झाले आहे. याशिवाय इतर बागायतदारांचेही नुकसान झाले असून तलाठी गुरव व कृषी सहाय्यक एस्. बी. जाधव यांनी बागेत जाऊन नुकसानीचा पंचनामा केला.
परब यांच्या बागेतील मोठी झाडे वादळी वाऱ्याने जमीनीवर कोसळली. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व वारंवार बदलत्या हवामानामुळे संकटात सापडलेला बागायतदार दुसरीकडे हंगामाच्या अंतिम टप्प्यात वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे.