वादळाने झोडपले

By admin | Published: March 27, 2015 12:34 AM2015-03-27T00:34:54+5:302015-03-27T00:35:30+5:30

पुन्हा मुसळधार : कणकवली, फोंडाघाट, वैभववाडीसह बांद्यात पाऊस

The storm swept away | वादळाने झोडपले

वादळाने झोडपले

Next

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी तालुक्यांत गुरुवारी दुपारी पावसाने पुन्हा हजेरी लावली. कणकवली तालुक्यातील कनेडी पंचक्रोशीला वादळाचा जोरदार तडाखा बसला असून, अनेक घरांची कौले तसेच पत्रे उडून गेले, तर विजेच्या खांबावर झाड पडल्याने कनेडी- नरडवे रस्त्यावरील वाहतूक तब्बल एक तास खंडित झाली होती.
बुधवारी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांत हजेरी लावल्यानंतर गुरुवारी पुन्हा दुपारी ३.३0 वाजण्याच्या सुमारास अचानक पावसामुळे कणकवली तालुक्यात दुकानदारांसह सर्वांचीच धावपळ उडाली. कनेडी पंचक्रोशीतील सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांना वादळाचा तडाखा बसला. कनेडी हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असतानाच आलेल्या जोरदार वादळामुळे एका इमारतीची काही कौले उडून गेली. मात्र, सुदैवाने दुर्घटना टळली.
हायस्कूलच्या शेजारीच असलेल्या मारुती सावंत यांच्या चाळीच्या छप्पराचे पत्रे तसेच कौले वाऱ्याने उडाली. भिरवंडे चर्चजवळील नार्वेकर यांच्या घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले, तर तेथेच उभी करून ठेवलेल्या गाडीवरही फांदी पडल्याने गाडीचे नुकसान झाले आहे. कनेडी-नरडवे मार्गावर नाटळ येथील मुंडले यांच्या मंगल कार्यालयासमोरील विजेच्या खांबावर झाड उन्मळून पडले. त्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला होता. तसेच हा मार्ग वाहतुकीसाठी तब्बल एक तास बंद झाला होता. जोरदार वादळामुळे दूरध्वनी सेवा तसेच वीज प्रवाह खंडित झाला होता.
वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने गुरुवारी सायंकाळी हजेरी लावली. महिन्यात सलग चौथ्यांदा झालेल्या या पावसामुळे शिल्लक आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील सर्वच भागांत पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव झाला. सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथेही मुसळधार पाऊस पडला. कणकवली तालुक्यातील नांदगाव भागासह कणकवलीत काही काळ विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला.
आंबा, काजू बागायतदारांना फटका
मुसळधार पाऊस तसेच वादळामुळे जिल्ह्यात लाखोंचे नुकसान झाले आहे. तर आंबा बागायतदारांनाही याचा जोरदार फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आंबा आणि काजू बागायतींना फटका बसला. यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
 

Web Title: The storm swept away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.