समुद्रात वादळसदृश स्थिती; सिंधुदुर्गात दिवसभर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:11 PM2018-08-27T23:11:24+5:302018-08-27T23:11:30+5:30
देवगड : समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी दिवसभर समुद्र खवळला असून, खोल समुद्रात मच्छिमारी करीत असलेल्या परराज्यांतील सुमारे १०० हून अधिक नौका सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये गुजरात व कर्नाटकमधील नौकांचा समावेश आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासूनच पावसाच्या संततधार सरी कोसळत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ताशी ३० ते ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, यामुळे समुद्रात घाळाघाळ निर्माण झाली आहे. मच्छिमारीसाठी वातावरणखराब व धोकादायक असल्याने खोल समुद्रात मच्छिमारी करत असलेल्या गुजरात व कर्नाटक राज्यातील मलपी येथील नौकांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, नाटे या भागातील नौकाही सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात सोमवारी दुपारपासून आश्रयासाठी दाखल झाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत नौका देवगड बंदरात आश्रयासाठी येत होत्या.