वैभववाडीत वादळी पावसामुळे दाणादाण; झाडे कोसळली, वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:10 PM2023-05-31T13:10:55+5:302023-05-31T13:11:14+5:30
पहिल्याच पावसात वैभववाडी तुंबली
वैभववाडी : वैभववाडी शहर व परिसरात वादळी पावसाने मंगळवारी सायंकाळी दाणादाण उडवून दिली. तालुक्यातील ५० ते ६० इमारतींचे नुकसान तर झालेच. शिवाय शेकडो झाडे उन्मळून पडल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वादळी पावसामुळे तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला. या मान्सूनपूर्व पावसामुळे २५ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याने शहरातील अनेक इमारतींंचे छत वाऱ्याने उडून गेले. वैभववाडी, करुळ, खांबाळे, एडगाव, कोकिसरे या गावांमध्ये मोठी पडझड झाली. करूळ जामदारवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. खांबाळे येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने वैभववाडी-फोंडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
वादळामध्ये राजापूर अर्बन बँकेनजीकच्या चार दुकान गाळ्यांवरील पत्र्याचे छप्पर उडाले. यातील एका गाळ्यांमध्ये तालुका खरेदी-विक्री संघाने ठेवलेल्या खताचे नुकसान झाले. याशिवाय साई डिजिटल, समाधान ॲटो गॅरेज, कोल्हापूर इलेक्ट्रिक गॅरेजचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय शहरातील अनेक इमारतींचे पत्रे उडाले आहेत. खांबाळेलाही वादळाचा तडाखा बसला. सावित्री पवार, रामचंद्र साळुंखे, अनंत वासुदेव साळुंखे यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले.
संतोष साळुंखे यांच्या कुक्कुटपालन शेडवर झाड कोसळल्याने आतील कोंबड्यांचा मृत्यू झाला.
कोकिसरे येथील दिलीप आयरे यांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत. कोकिसरे दत्तनगरी येथील श्रीरंग पवार आणि इतर चार जणांच्या घरांचे पत्रे उडाले.
आपत्ती व्यवस्थापन बेपत्ता
वैभववाडी शहरासह तालुक्यातील काही गावांना मंगळवारी दुपारनंतर झालेल्या वादळी पावसाचा तडाखा बसला. करुळसह अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. परंतु पोलिस आणि स्थानिकांनीच वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. शहरात नगरपंचायतीचे कर्मचारी काम करीत होते. परंतु आपत्ती व्यवस्थापनाचा कुठेही मागमूस दिसून आला नाही.
पहिल्याच पावसात वैभववाडी तुंबली
वैभववाडी शहरात जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात वैभववाडी जागोजागी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुने बसस्थानक, संभाजी चौक, दत्त मंदिर परिसरासह ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वैभववाडी तुंबलेली पाहायला मिळाली.