मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई : उदय सामंत यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:05 PM2020-09-28T12:05:01+5:302020-09-28T12:07:35+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नावीन्यपूर्ण मोहिमेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांनी महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात ३८ टक्के एवढे प्रभावी काम प्रशासनाने केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हे एकमेव साधन आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर सोमवारपासून पोलिसांमार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सिंधुदुर्गनगरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नावीन्यपूर्ण मोहिमेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांनी महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात ३८ टक्के एवढे प्रभावी काम प्रशासनाने केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हे एकमेव साधन आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर सोमवारपासून पोलिसांमार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आॅनलाईन पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. परंतु जनतेने पुढाकार घेतला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता कर्फ्यू लावल्यास माझा विरोधही नसेल.
पालकमंत्री सामंत म्हणाले, सकाळच्या सत्रात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्याशी कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक झाली.
मी जनतेला दिलेल्या आश्वासनासंदर्भात कोणती कार्यवाही झाली या संदर्भातही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात आॅक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी ७२ लाख रुपये खर्च करून आॅक्सिजन प्लांट तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ५८ मोठ्या बॉटल्स तयार होतील एवढी या प्लांटची क्षमता आहे. त्यामुळे कोविड रुग्णांना भविष्यात लस येईपर्यंत आॅक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत ३ हजार ५५० कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर सत्त्यात्तर जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ ते ७० टक्क्यांपर्यंत आहे. तर मृत्यूचे प्रमाण दोन टक्के एवढे आहे. टेस्टिंग क्षमता वाढविल्यास रिकव्हरी रेट ८० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो व मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यापर्यंत खाली येऊ शकते असा विश्वासही पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.
कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, व्यापाऱ्यांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नाही. मात्र, जिल्ह्यातील जनता एकत्र येऊन जनता कर्फ्यू लागू करू शकते. जनतेच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा असेल असे ते म्हणाले.
टीकेला उत्तर द्यावे असे वाटत नाही
आमदार नीतेश राणे यांनी आपल्यावर सडकून टीका केली आहे याबाबत पत्रकारांनी छेडले असता पालकमंत्री सामंत म्हणाले, त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे असे वाटत नाही. आमदार राणे यांना माझी भरपूर काळजी असल्याने ते माझी चौकशी करीत असतात. कोरोनाला हरविण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, असे नीतेश राणे यांना
उदय सांमत यांनी यावेळी आवाहन केले.
मास्कबाबत पोलिसांना आदेश दिले
सध्या कोरोनावर कोणत्याही प्रकारचे ठोस औषध सापडलेले नाही. इतर औषधोपचारांवर व रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर रुग्ण बरे होत आहेत. कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असेल तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझर या गोष्टींचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी माक्स लावूनच बाहेर कामानिमित्त फिरावे. मास्क न वापरणाºया नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आपण पोलीस प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.
पुढच्या वर्षी सिंधुदुर्गात अॅडमिशन होतील
सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी जिल्ह्यातील काही तरुण रक्तदान करून आगळेवेगळे आंदोलन छेडणार आहेत. त्यासाठी आपली भूमिका काय राहील? असा प्रश्न केला असता सामंत म्हणाले, तरुणांनी रक्तदान करावे. परंतु आंदोलन करू नये. कारण पुढच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे आणि तो पूर्णत्वास जाईल. पुढील वर्षी या कॉलेजमध्ये अॅडमिशन सुरू होतील, असा दावा पालकमंत्री सामंत यांनी केला.