कलाशिक्षकांना विशेष दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील : मनीषा कायंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:26 PM2020-02-07T16:26:53+5:302020-02-07T16:37:09+5:30
विद्यार्थ्यांसाठी कलेची दालने खुली करणाऱ्या कलाशिक्षकांचा कलाशिक्षक हा दर्जा काढून घेऊन मागील सरकारने शिक्षणाचा विनोद केला. त्या सरकारने केलेले पाप ठाकरे सरकार दूर करेल. कलाशिक्षकांना विशेष दर्जा देण्याबाबत शिवसेना आमदार विधिमंडळात आवाज उठवतील, असे प्रतिपादन विधान परिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केले.
मालवण : विद्यार्थ्यांसाठी कलेची दालने खुली करणाऱ्या कलाशिक्षकांचाकलाशिक्षक हा दर्जा काढून घेऊन मागील सरकारने शिक्षणाचा विनोद केला. त्या सरकारने केलेले पाप ठाकरे सरकार दूर करेल. कलाशिक्षकांना विशेष दर्जा देण्याबाबत शिवसेना आमदार विधिमंडळात आवाज उठवतील, असे प्रतिपादन विधान परिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघ यांच्यावतीने ४१ व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेचे आयोजन मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कलाशिक्षण परिषदेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार वैभव नाईक, कलाध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष पी. आर. पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख प्रियवंदा तांबोटकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, राज्य उपाध्यक्ष दादा भगाटे, सरचिटणीस एम. ए. कादरी, कोषाध्यक्ष नरेंद्र बारई, सहसरचिटणीस हिरामण पाटील, विभागीय उपाध्यक्ष बी. जी. सामंत, जिल्हाध्यक्ष रूपेश नेवगी, प्रकाश महाभोज, सचिव समीर चांदरकर, प्रसाद राणे, संभाजी कोरे, बबन शिंदे, हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी यांच्यासह कलाध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले, कलाशिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कला शिक्षकांचा दर्जा काढला गेला, शिक्षक भरती बंद केली. कला शिक्षकाला अतिरिक्त ठरविले जात आहे, अशा विविध समस्या आम्हांला सोडवायच्या आहेत. आमच्या समस्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. समस्यांच्या सोडवणुकीसाठी सर्व कलाशिक्षकांनी एकजूट दाखवावी.
अरुण दाभोलकर म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात कलाकार व कलाशिक्षकांची अवहेलना होत आहे. आजच्या पिढीला कलाशिक्षकांची नितांत गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: एक कलाकार आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत कलाशिक्षकांचे प्रश्न मांडल्यास मुख्यमंत्री त्यावर तोडगा काढतील, अशी आशा आहे. त्यामुळे आजच्या परिषदेतून कलाशिक्षकांची चळवळ महाराष्ट्रभर पोहोचविली पाहिजे.
राज्य कलाध्यापक संघाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार बाळकृष्ण गिरकर यांना तर कलातपस्वी पुरस्कार कलाशिक्षक बी. जी. सामंत यांना अरुण दाभोलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कलाशिक्षकांच्या कलेचा सन्मान करू; चित्रप्रदर्शन, २0 फुटी रांगोळी आकर्षण
मालवणी संस्कृतीची मेजवानी
या कलापरिषदेत उद्घाटन कार्यक्रमानंतर कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, संगीतनाट्य प्रवास, कोंबडा नृत्य, फिरत्या कॅनव्हासवर समीर चांदरकर यांची चित्रकला, रुपेश नेवगी यांचे सॅन्डआर्ट आदी कार्यक्रम पार पडले. ७ फेब्रुवारी रोजी चिवला बीच येथे वाळूशिल्प प्रात्यक्षिक, पुरस्कार वितरण, दशावतार रंगभूषा प्रात्यक्षिक, दशावतार सादरीकरण, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांचे प्रात्यक्षिक, लोककला सादरीकरण तर ८ रोजी रुजारिओ पिंटो यांचे मालवणी कविता वाचन, चर्चासत्र, निरोप समारंभ आदी कार्यक्रम होणार आहेत.
च्आमदार वैभव नाईक म्हणाले, मालवण हे कलेचे माहेरघर आहे. मालवण ही नवरत्नांची भूमी आहे. विद्यार्थ्यांमध्ये कला रुजविण्याचे कार्य कलाशिक्षकांकडून होत असते. मात्र, आज कलाशिक्षकांना अनेक प्रश्न, समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कलाशिक्षकांचे प्रश्न मुख्यमंत्री प्रामाणिकपणे सोडवतील. कलाशिक्षकांच्या योगदानाचा व कलेचा सन्मान करण्याचे काम सध्याचे सरकार करेल, असे ते म्हणाले.
च्यावेळी अरुण दाभोलकर यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला व जीवनमान दर्शविणारी वीस फुटी रांगोळीही साकारण्यात आली होती. नांदीने परिषदेची सुरुवात झाली. तर रुपेश नेवगी यांनी प्रास्ताविक करीत परिषदेची रूपरेषा व संकल्पना स्पष्ट केली. सूत्रसंचालन सुशांत पवार, गणेश गावकर यांनी केले.