मान्सूनचे दमदार आगमन
By admin | Published: June 15, 2014 12:30 AM2014-06-15T00:30:16+5:302014-06-15T00:30:39+5:30
ठिकठिकाणी घरांवर झाडे पडून नुकसान
कणकवली, कुडाळ : गेले काही दिवस प्रतीक्षा असलेल्या मान्सूनने शनिवारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात पावसासह वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी घरावर झाडे कोसळून नुकसानी झाली आहे.
कणकवली तालुक्यातील कोळोशी गावठणवाडीतील सुमारे १५० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड शनिवारी सकाळी ८.३० वाजता कोसळले. झाडालगत असलेल्या महानंदा गंगाराम सावंत यांच्या घरावर हे झाड कोसळल्याने सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले. आचरा येथे शुक्रवारी रात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसाचा तडाखा आचरा जामडूल येथील रहिवाशी सदाशिव पुंडलिक आचरेकर यांच्या घराला बसला. सदाशिव आचरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर पूर्णत: कोसळून ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
खेकडे पकडण्यासाठी गर्दी
पहिल्या पावसाचे पाणी ओहोळात आल्यावर आहोळामधील जमिनीत असणारे खेकडे बिळात पाणी जाताच बाहेर येतात. हे खेकडे (कुर्ली) पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी खेकडे पकडणाऱ्यांची धावपळ सुरु झाली असून अनेकजण रात्रीच्या अंधारात रिपरिप पावसात भिजत व कंदील, बॅटरी, पेटत्या टायरच्या उजेडात खेकडे पकडण्याचा आनंद लुटत आहेत. (प्रतिनिधी)