रॅलीतून मराठा समाजाचे जोरदार शक्तिप्रदर्शन
By admin | Published: October 18, 2016 11:48 PM2016-10-18T23:48:05+5:302016-10-18T23:48:05+5:30
सावंतवाडीत आयोजन : मोठ्या संख्येने बांधव सहभागी, फटाक्यांची आतषबाजी, शहरातील वातावरण भगवामय
सावंतवाडी : ‘एक मराठा लाख मराठा... जय भवानी जय शिवाजी...’ अशा एकापेक्षा एक घोषणांनी सुंदरवाडीचा परिसर चांगलाच दणाणून सोडत मराठा बांधवांनी सावंतवाडीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले
२३ आॅक्टोबरला मराठा समाजाचा क्रांती मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी सावंतवाडी येथे तालुक्यातील मराठा बांधवांच्या खास रॅलीचे आयोजन करण्यात आले होत. या रॅलीत शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.
सावंतवाडीतील जिमखाना मैदानावरून सकाळी ११ वाजता तालुक्यातील मराठा बांधवांची खास दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला प्रथम येथील जिमखाना मैदानावर संबोधन करण्यात आले. त्यानंतर ही रॅली सुरू झाली. येथील गवळी तिठा येथे फटाक्याची आतषबाजी केल्यानंतर ही रॅली माठेवाडा येथे आत्मेश्वर मंदिरकडून डॉ. परूळेकर यांच्या हॉस्पिटलला वळसा घालून मुख्य महामार्गावरून खासकीलवाडा येथे आली व तेथे शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ््याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ही रॅली मोती तलावाकडून शिरोडा नाका येथून मुख्यबाजारपेठ व गांधी चौक असे करीत शिवरामराजेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
तेथून ही रॅली आर. पी. डी. हायस्कूलमध्ये विसर्जित करण्यात आली. रॅलीत विक्रांत सावंत, मनोज नाईक, रूपेश राऊळ, सदानंद सावंत, अॅड. श्यामराव सावंत, अॅड. अमोल कविटकर, नितीन कुडतरकर, उमाकांत वारंग, संदीप सावंत, सीताराम गावडे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेस नेते विकास सावंत, सभापती प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, अशोक दळवी, राजू मुळीक, बाळू माळकर, संतोष घाडी, उदय भोसले, लहू भिंगारे, अमित परब, रेश्मा सावंत, भारती मोरे, अर्पणा कोठावळे, विश्वनाथ घाग, संतोष सावंत, मनोज सावंत, यशवंत आमोणेकर आदींसह मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी रॅलीत सहभाग नोंदविला.
या रॅलीमुळे वातावरण भगवेमय झाले होते. तसेच सावंतवाडीचा परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. तब्बल तीन तास रॅली सुरू होती. शहरातील प्रत्येक नाक्या-नाक्यावर अनेकजण रॅलीकडे पाहत होते आणि दाद देत होते. या रॅलीसाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांचे मराठा समाजाच्यावतीने कौतुकही करण्यात आले. या बंदोबस्तात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी सावंत, उपनिरीक्षक जयदीप कळेकर, सुधाकर आरोलकर, हेडकॉँस्टेबल दाजी सावंत, अमोल सरगळे, विकी गवस, राजलक्ष्मी राणे, अमर नारनवर आदींसह मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)