सशक्त पिढीसाठी परीक्षा पध्दती आवश्यक

By admin | Published: August 27, 2015 11:35 PM2015-08-27T23:35:18+5:302015-08-27T23:35:18+5:30

शिक्षण हक्क कायदा : विद्यार्थ्यांची गुणवत्ता तरी वाढू द्या...!--लोकमत सर्वेक्षण

Strong generation requires methods of examination | सशक्त पिढीसाठी परीक्षा पध्दती आवश्यक

सशक्त पिढीसाठी परीक्षा पध्दती आवश्यक

Next

मेहरुन नाकाडे - रत्नागिरीशिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करता पुढील वर्गात प्रवेश देण्यात येतो. आठवीपर्यंत पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना पाठविले जात असल्यामुळे नववीच्या वर्गात पास होणे अवघड जाते. तसेच शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक पातळी तपासण्यासाठी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. एकूणच परीक्षा पध्दती आवश्यक की, अनावश्यक यावर शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. परंतु सर्वांच्या प्रतिक्रियेतून स्पर्धेच्या युगात सशक्त पिढी तयार करण्यासाठी परीक्षा पध्दती आवश्यक असल्याचे मत दिसून आले.
पहिली ते आठवीपर्यंत जे विद्यार्थी नापास होतात, त्यांना त्याच वर्गात बसवण्याऐवजी पुढील वर्गात ढकलण्यात येते. त्यामुळे आठवीच्या वर्गात आल्यानंतर त्यांना आधीचं काही येत नाही. यावरून शिक्षणाचा दर्जा घसरलेला दिसून येत आहे. काही शाळांमधील तिसरीच्या, पाचवीच्या विद्यार्थ्यांना पहिलीचे पुस्तकही वाचता येत नाही. विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहिल्याने त्याचा परिणाम नववीच्या निकालावर होत आहे. ज्या शाळांच्या पहिली ते नववीपर्यंत प्रत्येकी दोन तुकड्या आहेत, त्या शाळांची दहावीची केवळ एकच तुकडी आहे. दहावीचा निकाल राखण्यासाठी काही शाळांनी शक्कल लढवून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश, तर तळ्यात-मळ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सतरा नंबरचे फॉर्म भरण्यात येतात.
आठवीपर्यंत पासमुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची सवय नष्ट झाली आहे. पालकांमध्येही शिथीलता आली आहे. विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मकवृत्ती कमी झाल्यामुळे परीक्षा पध्दती व अभ्यासाचे गांभीर्य राहिलेले नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होत असलेला दिसून येत आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन करण्यात येत असल्यामुळे अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांमधील क्रीडा, कला गुण हेरून त्यांना प्रोत्साहित करण्यात येते. अभ्यासाबरोबर इतर कलागुणांना वाव मिळून संबंधित विद्यार्थी कौतुकास पात्र ठरत आहेत. शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी परीक्षा पध्दत सुरू ठेवली असली तरी शासकीय निर्णयानुसार ग्रेड पध्दतीचा अवलंब करण्यात येतो.

विशेष अध्यापन....
एखाद्या विषयात नापास किंवा कमी गुण मिळाले आहेत, त्याबाबत खास विद्यार्थ्यांसाठी वर्गात जादा तास घेऊन त्यांच्यासाठी विशेष अध्यापन केले जात आहे. जेणेकरून संबंधित विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांबरोबर एका विशिष्ट पातळीवर येतील. त्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांचे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत.

Web Title: Strong generation requires methods of examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.