किनारपट्टीवर जोरदार वारे; मासेमारी, सागरी पर्यटन थंडावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:01 PM2024-03-12T12:01:49+5:302024-03-12T12:02:13+5:30
मागील १५ दिवसांपासूनची परिस्थिती आठवडाभर राहण्याची शक्यता
संदीप बोडवे
मालवण : महाशिवरात्रीच्या कालावधीत कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे येथील मासेमारी व्यवसाय १५ दिवसांपासून थंडावला आहे. एरवी समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यांवर नांगरून ठेवण्यात आल्यामुळे मासळीचे दर सुद्धा गगनाला भिडले आहेत.
जोरदार वाऱ्यांचा परिणाम किनारपट्टीवरील पर्यटनावर सुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अशी परिस्थिती अजून आठवडाभर राहण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या कालावधीत कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहतात. अशावेळी समुद्रात बोटी घेऊन जाणे धोकादायक असते.
येथील किनारपट्टीवर वावळ (हूक फिशिंग), गीलनेट, न्हय, रापण आणि ट्रॉलिंग पद्धतीची मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. या पद्धतीच्या मासेमारीतून सुरमई, पापलेट, बांगडे, गोबरा, तांबोशी, कोकरी, बोईट, सावंदाळा, टोकी, पेडवे, तारली, कोलंबी, कुर्ले, म्हाकुल, मोडुसा, काडय आदी मासे बाराजांतून दुर्मिळ झाले आहेत.
मासळीचे दर अवाक्याबाहेर
मासळीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सुरमय १२०० रुपये किलो, बांगड्यांची टोपली (८० नग) १५००, मोठ्या बांगड्यांची टोपली (४५ नग) २००० रुपये, सरंगा ८०० किलो, सवंदळा ८ नग २०० रुपये, कोलंबी ३५० ते ४०० रुपये किलो या दराने मासे विकले गेले आहेत.
जोराच्या वाऱ्यांचा किनारपट्टीवरील सागरी पर्यटनावरही परिणाम झाला आहे. स्कूबा डायव्हिंग, बोटिंग सफारी, पॅरासेलिंग आदी सागरी पर्यटनाला जोराच्या वाऱ्यांचा फटका बसला आहे. - समीर गोवेकर, सागरी पर्यटन व्यवसायिक.
गेले महिनाभर येथील मत्स्य व्यवसायाची परिस्थिती खूपच निराशाजनक आहे. वेगाच्या वाऱ्यांमुळे मासळी खोल समुद्राच्या दिशेने सरकली आहे. मासेमारीसाठी समुद्रात बोटी घेऊन जाणे धोकादायक बनले आहे. मासळी मिळत नसल्यामुळे खलाशांचा खर्च भागात नाही. ५०० ते १००० रुपये इंधन खर्च होत असून, जाळ्याला मासळी मिळत नसल्यामुळे मासेमारी तोट्यात चालली आहे.- रश्मीन रोगे, पारंपरिक मच्छीमार