अनुजा तेंडोलकर यांना स्ट्राँग वुमन आॅफ एशिया किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 04:21 PM2018-12-18T16:21:52+5:302018-12-18T16:27:05+5:30
अनुजा तेंडोलकर यांनी महिला गटात चार सुवर्णपदके पटकावली. पॉवरलिफ्टींग गटात खेळून त्यांनी विक्रम प्रस्थापित केल्याने त्यांचा स्ट्राँग वुमन आॅफ एशिया किताबाने सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
वेंगुर्ले : मंगोलिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत वेंगुर्ले येथील श्री सातेरी व्यायामशाळेच्या खेळाडू अनुजा तेंडोलकर यांनी महिला गटात चार सुवर्णपदके पटकावली. या गटात खेळून त्यांनी विक्रम प्रस्थापित केल्याने त्यांचा स्ट्राँग वुमन आॅफ एशिया किताबाने सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत अनुजा तेंडोलकर यांनी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्यावतीने सहभाग घेत सुवर्णपदकांची लयलूट केली. पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ८४, ८४+ मास्टर ३ महिला गटात आतापर्यंत कुणीही स्पर्धक सहभागी झाला नव्हता. मात्र अनुजा तेंडोलकर यांनी या गटात सहभाग घेऊन तब्बल चार सुवर्णपदके पटकावली आणि भारतातील महिला स्ट्राँगेस्ट असल्याचे जगाला दाखवून दिले आहे.
त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल एशियन पॉवरलिफ्टींग फेडरेशनचे अध्यक्ष फरसीद सुलतानी, भारतीय संघाचे अध्यक्ष व एशियन क्लासिक पॉवरलिफ्टींग फेडरेशनचे सचिव राजेश तिवारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सातेरी व्यायामशाळा यांच्यासह जिल्हावासीयांकडूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून ५०० हून अधिक स्पर्धक विविध गटातून सहभागी झाले होते. त्यात भारतातील विविध राज्यातील नामवंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सहभाग होता. या सर्वांवर मात करीत वयाच्या ६० व्या वर्षी मिळविलेल्या या यशामुळे अनुजा तेंडोलकर सिंधुदुर्गच्या आयर्न लेडी ठरल्या आहेत.