सिंधुदुर्गवासीयांना टोलमुक्ती न मिळाल्यास संघर्ष अटळ, कृती समितीचा निर्धार

By सुधीर राणे | Published: June 13, 2023 03:30 PM2023-06-13T15:30:54+5:302023-06-13T15:31:54+5:30

ओसरगाव येथील टोल नाक्यावर उद्या आंदोलन

Struggle is inevitable if Sindhudurg residents do not get toll exemption | सिंधुदुर्गवासीयांना टोलमुक्ती न मिळाल्यास संघर्ष अटळ, कृती समितीचा निर्धार

सिंधुदुर्गवासीयांना टोलमुक्ती न मिळाल्यास संघर्ष अटळ, कृती समितीचा निर्धार

googlenewsNext

कणकवली : मुंबई- गोवा महामार्गावर ओसरगाव येथील टोल नाका उद्या बुधवारी (दि.१४) सुरु होणार असल्याची अधिसूचना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व महामार्ग मंत्रालय यांच्याकडून प्रसिद्ध झाली आहे. मात्र, सिंधुदुर्गवासीयांना टोलमुक्ती मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. सिंधुदुर्गात पासिंग झालेल्या सर्व गाड्यांना टोलमुक्ती द्यावी किंवा आम्हाला पर्यायी रस्ता द्यावा. ते शक्य नसल्यास ओसरगाव येथील टोलनाका जिल्ह्याबाहेर हलवावा.  त्यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करु अशी भूमिका टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये यांनी स्पष्ट केली. तसेच उद्या ओसरगाव टोल नाक्यावर समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत सिंधुदुर्गवासीयांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही केले. 

कणकवली येथे टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समितीची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर, संजय भोगटे,दीपक बेलवलकर,अनंत पिळणकर, विलास कोरगावकर,दादा कुडतरकर, नितीन म्हापणकर, मठकर,विनायक उर्फ बाळू मेस्त्री,कन्हैया पारकर,प्रमोद मसुरकर, कमलेश नरे, उत्तम राणे,सादिक कुडाळकर, लाड आदी उपस्थित होते. 

टोल बाबतचा बुद्धिभेद थांबवावा!

ओसरगांव टोल नाक्यामुळे जिल्हयाचे विभाजन होत आहे.न्यायालय, प्रशासकीय कार्यालये,  जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय ,वैद्यकीय महाविद्यालय आदीसाठी चार तालुक्यांतील लोकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.  टोल बाबत काही जणाकडून  सातत्याने बुद्धिभेद केला जात आहे. तो थांबवावा. आम्ही टोल माफी नव्हे तर टोल मुक्ती मागत आहोत. जिल्हातर्गत प्रवास करताना टोल नको असे आमचे म्हणणे आहे. याबाबत आतापर्यंत शासन तसेच प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना वारंवार निवेदने, चर्चा केली आहे. आमचा प्रस्ताव, मागणी त्यांच्यासमोर ठेवली आहे. ती मागणी कोणीही झिडकारलेली नाही. उलट सकारात्मकता दाखवत मागणी बाबत विचार सुरु असल्याचेच आम्हाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर टोल बाबतचा निर्णय आम्हाला द्यावा.

आम्हाला खिंडीत गाठून अन्यायकारक टोल आकारू नये. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व इतर लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलेला शब्द पाळावा. अन्यथा संघर्ष अटळ असून बुधवारी ओसरगाव येथील टोल नाक्यावर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल. प्रशासनाने संघर्ष करायला भाग पाडू नये तसेच आंदोलन चिघळवू नये. या आंदोलनात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही नितीन वाळके यांनी केले. 

सिंधुदुर्गातील लोकांवर अन्याय का?  

सिंधुदुर्ग वासीयांना टोल मुक्ती मिळत नाही तोपर्यंत ओसरगाव येथील टोल नाका आम्ही सुरू होऊ देणार नाही. त्यासाठी कोणतीही भूमिका घ्यावी लागली तरी चालेल असा निर्धार करण्यात आला. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात स्थानिक नागरिकांना टोल मुक्ती देण्यात आली आहे. त्याबाबत आम्ही माहिती संकलित केली आहे. गोव्यातही तेथील लोकांना टोल मुक्ती देण्यात आली आहे. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांवरच फक्त टोल आकारून अन्याय का केला जात आहे? असा सवाल नंदन वेंगुर्लेकर यांनी केला.

Web Title: Struggle is inevitable if Sindhudurg residents do not get toll exemption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.