सिंधुदुर्ग : विद्यार्थ्याची कर्ली नदीत आत्महत्या, नेरुर येथील घटना : आत्महत्येचे कारण अस्पष्ट; शुक्रवारपासून होता बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:22 PM2018-01-08T13:22:12+5:302018-01-08T13:28:40+5:30
कुडाळ तालुक्यातील नेरूर कुलदेवता मंदिरनजीक राहणारा बारावीत शिकणारा विद्यार्थी रोहित चंद्रशेखर नाईक (१८) याने नेरूरपार येथे कर्ली नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.
चौके : कुडाळ तालुक्यातील नेरूर कुलदेवता मंदिरनजीक राहणारा बारावीत शिकणारा विद्यार्थी रोहित चंद्रशेखर नाईक (१८) याने नेरूरपार येथे कर्ली नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.
शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या जयश्री वामन प्रभू कनिष्ठ महाविद्यालयात रोहित नाईक हा बारावीत शिकत होता. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून तो बेपत्ता होता. काही स्थानिकांना रोहीत हा शुक्रवारी सकाळी नेरूरपार पुलावर घुटमळताना दिसला होता.
तो शाळेतही गेला नाही. आणि घरीही परतला नाही. त्यामुळे सायंकाळनंतर शोधाशोध करण्यात आली. गेले तीन-चार दिवस तो शाळेत गैरहजर होता. फक्त काळसे हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनादिवशी म्हणजे ३ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात तो शाळेत आल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शुक्रवार ५ रोजी दुपारी २ वाजता कॉलेज ठेवण्यात आले होते. परंतु रोहित हा सकाळी ७ वाजताच कॉलेजचा गणवेश घालून आणि दप्तर घेऊन घरातून बाहेर पडला. परंतु तो कॉलेजला न येता त्याने नेरूरपार पुलावरून कर्ली नदीपात्रात उडी मारून आपले जीवन संपविले.
शनिवारी सकाळपासून कर्ली नदीत बोटीच्या सहाय्याने स्थानिक तरूणांनी शोध मोहीम राबविली असता सकाळी नेरूरपार पुलानजीक नदीत रोहितचे दप्तर पाण्यावर तरंगताना सापडले. त्यानंतर शोध घेतला त्यावेळी पुलाच्या खालच्या बाजूला काही मीटर अंतरावर सरंबळ हद्दीत रोहितचा मृतदेह सापडला.
बोटीच्या सहाय्याने शोध घेणारे काळसे ग्रामपंचायत सदस्य सचिन सावंत, महेश हडकर आणि स्थानिक तरूणांनी दुपारी सव्वा एक वाजता मृतदेह दोरीच्या सहाय्याने नेरूरपार जेटीनजीक आणला.
पोलीस पाटील गणपत मेस्त्री यांनी कुडाळ पोलिसांना मृतदेह सापडल्याची माहिती दिली. काळसे सरपंच केशव सावंत, काळसे हायस्कूलच्या संस्था चेअरमन अर्चना प्रभू, मुख्याध्यापक के. जी. वालावलकर आणि शिक्षकांनी शोध मोहीमेदरम्यान घटनास्थळी भेट दिली.
रोहित नाईक उत्कृष्ट कबड्डीपटू
उत्कृष्ट कबड्डीपटू असणाऱ्या रोहित नाईक याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. कुडाळ पोलीस ठाण्याचे भगवान चव्हाण आणि हिपकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालय कुडाळ येथे पाठविण्यात आला.