विद्यार्थी,पालकांचा ठिय्या
By admin | Published: June 17, 2015 11:57 PM2015-06-17T23:57:33+5:302015-06-18T00:40:28+5:30
शाळा सोडल्याचे दाखले अडविले : पाट हायस्कूलमधील प्रकार
सिंधुदुर्गनगरी : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले अडवून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांकडून केले जात आहे. या मनमानी कारभाराविरोधात न्याय मागण्यासाठी बुधवारपासून विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषद भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील पाट हायस्कूलच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले फी भरण्याच्या कारणावरून रोखून ठेवण्यात आले आहेत. या विरोधात बुधवारी जिल्हा परिषद भवनासमोर संबंधित विद्यार्थी व पालक यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यामध्ये महेश वेळकर, मकरंद मराळ हे पालक, स्वप्नील गवाणकर, ओमकार म्हापणकर, लक्ष्मण वेळकर, अनिकेत गोवेकर, शुभम हळदणकर, कृष्णा गावडे हे विद्यार्थी यासह २० ते २५ उपोषणकर्त्यांचा समावेश आहे.
मुख्याध्यापक व काही मोजके सभासद यांची सभा घेऊन निश्चित करण्यात आलेली १० हजार ५०० रुपये एवढी फी भरणे गरीब पालकांना परवडणारी नाही. पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी फीच्या कारणावरून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले अडवून ठेवले आहेत. या विरोधात संबंधित विद्यार्थी व पालकांनी बुधवारपासून जिल्हा परिषद भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जादा फी न भरल्याने दाखले रोखले. त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद भवनासमोर बुधवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली
आहे. (प्रतिनिधी)
पालकांचे म्हणणे
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला मिळावा म्हणून पाट हायस्कूलकडे रितसर अर्ज केला होता. मात्र, दाखले आणण्यासाठी गेलो असता पूर्ण फी भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही असे संस्थेकडून सांगण्यात आले. शासकीय नियमानुसार होणारी फी भरण्यास आम्ही तयारी दर्शविली असता पालक सभेमध्ये ठरविल्याप्रमाणे १० हजार ५०० रुपये फी भरत नाही तोपर्यंत शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही अशी भूमिका पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची असून यासाठी दाखले रोखून ठेवले आहेत असे या पालकांचे म्हणणे आहे.