‘त्या’ विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

By admin | Published: July 10, 2014 12:23 AM2014-07-10T00:23:47+5:302014-07-10T00:29:53+5:30

आंबोली दरीत गिर्यारोहकांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश

The student's body was found | ‘त्या’ विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

‘त्या’ विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

Next

आंबोली : आंबोली कावळेशेत येथे सुमारे १८०० फूट खोल दरीत कोसळलेल्या विजापूर येथील पवन कुलकर्णी याचा मृतदेह शोधण्यात गिर्यारोहकांना यश आले. मुसळधार पाऊस व दाट धुक्याच्या अडथळ्यावर मात करत सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचर, बाबल आल्मेडा टीम, अजिंक्य अ‍ॅडव्हेंचर, शिवदुर्ग मित्रमंडळ, लोणावळा, यशदा प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी सुमारे पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला.
सोमवारी दुपारी कावळेशेत येथील धबधब्यावरून पाय घसरून कोसळलेल्या पवन कुळकर्णीचा मृतदेह धबधबा कोसळणाऱ्या ठिकाणापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील ओढ्याच्या शेजारी अडकलेल्या स्थितीत आढळून आला. कोल्हापूरच्या व्हाईट आर्मी गिर्यारोहकांनी पुणे व लोणावळा येथून अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेल्या गिर्यारोहकांना पाचारण केले होते. यातील नीलेश चव्हाण व अमोल रणदिवे या दोघांनी धबधब्याच्या शेजारून पंधराशे फूट खाली उतरून दुर्बिणीच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध लावला. तोपर्यंत बाबल आल्मेडा यांच्या टीमने नारायण येथील पायवाटेने तब्बल चार तासानंतर घटनास्थळ गाठले. प्रचंड पाऊस व धुक्यामुळे शोधकार्यात वारंवार अडथळे येत होते. आल्मेडा यांच्या टीमने पवनचा मृतदेह दरीतून वर आणला. त्यानंतर मृतदेह आंबोली प्राथमिक केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
या मोहिमेत लाईफ लाईन फॉर नेचर अ‍ॅण्ड ह्युमन बिर्इंग, डिझस्टर रेस्क्यू लाईफ गार्ड सोसायटी, काडगाव, कोल्हापूर व्हाईट आर्मी सिंधुुदुर्ग अ‍ॅडव्हेंचर्सचे डॉ. कलमेश चव्हाण, अभिजीत चव्हाण, अजिंक्य अ‍ॅडव्हेंचर्स सुजित गायकवाड, दिनकर कांबळे, गणेश गिर, महेश मसणे, सचिन गायकवाड, सुरेंद्र शेळके, संतोष शेलार, अमोल रणदिवे, नीलेश चव्हाण, समीर जोशी, आनंद गावडे यांनी या मोहिमेत भाग घेतला होता. मृतदेह मिळाल्याचे कळताच पवनच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत केलेला आक्रोश काळीज पिळवटणारा होता. पुणे, लोणावळा तसेच अन्य जिल्ह्यातून आलेल्या गिर्यारोहकांनी शोध मोहिमेसाठी केलेल्या खर्चाची मागणी प्रभारी तहसीलदार शशिकांत जाधव यांनी देण्याचे मान्य
केले. (प्रतिनिधी)

Web Title: The student's body was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.