मुंबईतील विद्यार्थ्यांचा बांबूकलेचा अभ्यास, कुडाळमध्ये घेतायेत खास प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 01:02 PM2017-10-31T13:02:26+5:302017-10-31T13:12:07+5:30
बांबूपासुन बनविण्यात येणाऱ्या कलात्मक वस्तुंचं प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रीय इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी आले आहेत.
कुडाळ- बांबूपासुन बनविण्यात येणाऱ्या कलात्मक वस्तुंचं प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रीय इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी आले आहेत. ते कुडाळ मध्ये पाच दिवस करणार बांबु कलेचा अभ्यास करणार आहेत.
कोकणातील व विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबू, माणगा या क्षेत्रात काम करणाऱ्या कारागीर, कलाकारांनी पारंपारिक वस्तू बनविण्याबरोबरच या बांबू पासून मोठ्या प्रमाणात कलात्मक वस्तु निर्माण करण्यास सुरूवात केली असून या वस्तुंना ग्राहकांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या वस्तु कशा बनविल्या जातात, या वस्तुमध्ये आणखी कशा पध्दतीने नवीन आकार तयार करता येतील, ग्राहकांच्या पसंतीस या वस्तु कशा उतरतील याचा अभ्यास व बांबु वस्तुचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रीय इन्स्टीट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील अंकीता मल्होत्रा, अदत्त देव, पुजा पालक, साम्या खान, ऐश्वर्या पाठारे, दिप्ती नायर, पारसमनी मोदी, अन्यना राज, निकीता वाजपेयी, हर्षद शर्मा, श्रृती गोडे हे विद्यार्थी व विद्यार्थीनी कुडाळ डॉ. आंबेडकर नगर येथे आले असून प्रशिक्षिका लता मालवणकर या त्यांना बांबु पासून कलात्मक वस्तू कशा बनवाव्यात याचे प्रशिक्षण देत आहेत.
यावेळी बोलताना विद्यार्थ्यानी सांगितले की, त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात कार्यानुभव विषयामध्ये अशा प्रकारे विविध कलांचे शिक्षण घेण्यासाठी आलो असून आमच्याच कॉलेजचा दुसरा ग्रुप कुडाळ येथे चित्रकथी या कलेचे प्रशिक्षण घेत आहे.
या विद्यार्थ्यांना बांबु वस्तुंचे मार्गदर्शन सुजाता कुडाळकर व मिनाक्षी कुडाळकर यांनी केले. यावेळी या विद्यार्थ्यांसोबत शिक्षिका टुलिका टडंन या ही उपस्थित होत्या.