विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

By admin | Published: April 7, 2017 10:45 PM2017-04-07T22:45:47+5:302017-04-07T22:45:47+5:30

जिल्हा परिषद; चारही नवीन चेहरे; सर्व तालुक्यांना न्याय देण्याचा प्रयत्न

Subject Committee Speaker Elections uncontested | विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

Next



सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदासाठीची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी बिनविरोध पार पडली. त्यानुसार समाजकल्याण सभापतिपदी शारदा शंकर कांबळे, महिला व बालकल्याण सभापतिपदी सायली समीर सावंत, तर विषय समिती सभापतिपदी प्रीतेश शंकर राऊळ व संतोष वसंत साटविलकर यांना काँग्रेसने संधी दिली आहे. काँग्रेसने चारही सभापतिपदांसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, देवगड आणि दोडामार्ग वगळता सर्व तालुक्यांना प्रतिनिधित्व दिले आहे.
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठीची खास सभा पीठासन अधिकारी तथा निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण खाडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर तसेच सभागृहात सदस्य उपस्थित होते.
सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सभापतिपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करायचे होते. या वेळेत काँग्रेसच्यावतीने समाजकल्याण सभापतिपदासाठी शारदा कांबळे, महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी सायली सावंत, तर विषय समिती सभापतिपदासाठी प्रीतेश राऊळ व संतोष साटविलकर यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. विरोधी गटातील सदस्यांनी मात्र नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे दुपारी ३.३० वाजता पीठासन अधिकारी प्रवीण खाडे यांनी काँग्रेसच्या वरील चारही नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांचा अल्प परिचय
समाजकल्याण सभापतिपदी विराजमान झालेल्या शारदा कांबळे या वैभववाडी तालुक्यातील कोंडये जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत या कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. सावंत या कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रमाकांत सावंत यांच्या स्नुषा आहेत, तर प्रीतेश राऊळ हे रेडी व संतोष साटविलकर हे पेंडूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. साटविलकर यांनी यापूर्वी मालवण उपसभापतिपद उपभोगले असल्याने त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे.
सहा तालुक्यांमध्ये पदे
सावंतवाडी, वेंगुर्ले, कणकवली, वैभववाडी, कुडाळ, मालवण या तालुक्यांमधून काँग्रेसला अपेक्षित यश मिळाल्याने या तालुक्यातून पदाधिकारी निवड करण्यात आली. तर दोडामार्ग व देवगडमध्ये काँग्रेसला अपेक्षित असे यश मिळालेले नव्हते.

उपाध्यक्षांनी मानले आभार
सभापतिपदासाठीची निवड प्रक्रिया विरोधक अनुपस्थित राहिल्याने बिनविरोध पार पडली. जर विरोधकांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असते, तर निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागणार होती. मात्र, विरोधकांनी नामनिर्देशन दाखल न केल्याने निवडणुकीस सामोरे जावे लागले नसल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. विरोधकांनी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी विरोधकांचे आभार मानले.

Web Title: Subject Committee Speaker Elections uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.