Sindhudurg: गुलदार युद्धनौका समुद्रतळाशी स्थापित करणार, युद्धपातळीवर काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:15 IST2025-03-21T17:14:36+5:302025-03-21T17:15:13+5:30
स्वतंत्र एजन्सी नेमणार : गोव्याच्या दिशेने तोंड, २३ मीटर खोलीत बुडविणार

Sindhudurg: गुलदार युद्धनौका समुद्रतळाशी स्थापित करणार, युद्धपातळीवर काम सुरू
संदीप बोडवे
मालवण : आयएनएस गुलदारसारखी भलीमोठी युद्धनौका विशिष्ट प्रकल्पासाठी समुद्रात बुडविणे मोठे जोखमीचे आणि कौशल्याचे काम आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमूनच निवतीच्या समुद्रात ठरलेल्या ठिकाणी ही युद्धनौका बुडविण्यात येणार आहे.
युद्धनौका समुद्रात बुडवीत असताना युद्धनौकेला कोणतीही हानी होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे समुद्रात बुडविल्यानंतर समुद्र तळाशी ही युद्धनौका सरळ, स्थिर आणि उभ्या स्थितीत ठेवणे मोठे जिकिरीचे काम असणार आहे.
एकंदरीत निवती रॉक समुद्रातील पाण्याचा प्रवाह, लाटा, पावसाळी तुफानाची परिस्थिती, आदींचा विचार करून ही युद्धनौका समुद्र तळाशी स्थापित केली जाणार आहे.
२३ मीटर खोल गोव्याच्या दिशेने तोंड..
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून सर्व्हे करून निवती रॉकजवळील समुद्रात २३ आणि २१ मीटर खोली असलेल्या दोन जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. आयएनएस गुलदारची उंची २२ मीटर असल्याने कदाचित नव्याने सर्व्हे करून थोडी जास्त खोलीची जागा निश्चित करण्यात येईल, अन्यथा २३ मीटर खोलीत ही युद्धनौका स्थापित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे समुद्रात उत्तर ते दक्षिण आणि दक्षिण ते उत्तर असे दोन सागरी पाण्याचे प्रवाह असतात. यापैकी दक्षिण ते उत्तर (स्थानिक भाषेत उपरचा प्रवाह) हा तुलनेने जास्त प्रभावी असतो. यामुळे गुलदार युद्धनौका दक्षिण दिशेकडे म्हणजे गोव्याच्या दिशेने तोंड करून समुद्रतळाशी स्थापित केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले..
नव्या प्रकल्प सल्लागाराची नेमणूक
सुरुवातीला या प्रकल्पाची प्रकल्प आरेखक आणि सल्लागार म्हणून एमटीडीसीचे जल पर्यटन सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. डॉ. कुलकर्णीं यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी पर्यटन विभागाने नौदलातील निवृत्त अधिकारी अरुण करकरे यांची नेमणूक केली आहे. नौदलात कॅप्टन पदावरून निवृत्त झालेल्या करकरे यांना सागरी सल्लागार म्हणून २५ वर्षांचा अनुभव आहे. ते या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी, सुरक्षितता आणि विविध परवान्यांची जबाबदारी सांभाळणार आहेत. पर्यावरण, प्रदूषण, पोर्ट, इंडियन रजिस्ट्री शिपी (आयआरएस), आदींकडून एनओसी प्राप्त झाल्यानंतरच नौका बुडविण्यात येणार आहे.
स्वप्न होणार साकार..
मालवण, निवती समुद्रात सागरी पर्यटन सुरू आहे. मात्र, त्याला जागतिक दर्जा नव्हता. तो मिळावा यासाठी या क्षेत्रातील डॉ. सारंग कुलकर्णी यांच्यासारख्या अभ्यासकांनी प्रयत्न चालविले होते. याचाच एक भाग म्हणून २०१९ मध्ये भारतीय नौदलाची ग्रँड ओल्ड लेडी म्हणून ओळखली गेलेली आयएनएस विराट विमानवाहू युद्ध नौका निवृत्तीनंतर सिंधुदुर्गच्या समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्याचे ठरले होते. परंतु, दुर्दैवाने ही युद्धनौका भंगारात गेल्यानंतर सिंधुदुर्गचे विराट स्वप्नसुद्धा तिच्यासोबत भंगले होते. अमेरिकेतील फ्लोरिडानंतर जगातील सर्वांत मोठी युद्धनौका निवतीच्या समुद्रात पर्यटनासाठी बुडविली जाणार होती. आता हेच स्वप्न आयएनएस गुलदारपर्यंत येऊन ठेपले आहे.
थँक्स डीएसके मास्तर
सिंधुदुर्गातील सागरी पर्यटनाला जागतिक दर्जा मिळावा यासाठी अहोरात्र झटणारे डॉ. सारंग कुलकर्णी यांनी राजीनामा दिल्याने ते आज या प्रकल्पासोबत नाहीत. सिंधुदुर्गातील नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार सागरी पर्यटनासाठी डॉ. सारंग कुलकर्णी यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या स्वप्नांचा पाठलाग केला. आज हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जात असताना डॉ. कुलकर्णी या प्रकल्पासोबत हवे होते, असे सांगतानाच ‘थँक्स डीएसके मास्तर’ अशा शब्दांत त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. .