आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यमची भारतीय पोलीस सेवा दलात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 02:16 PM2020-10-08T14:16:56+5:302020-10-08T14:18:38+5:30
sindhudurg, upscexam, educationsector यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारा आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
आचरा : यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारा आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
आचरा-चिंदर गावचा सुपुत्र असलेल्या सुब्रमण्यम केळकर याने यूपीएससी परीक्षेत देशस्तरावर ४९७वा क्रमांक मिळवित उज्ज्वल यश संपादन केले होते. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत होते. दरम्यान, सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली असल्याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. तो लवकरच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे.
मालवण तालुक्यातील एका छोट्या गावात राहणारा, लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ््यासमोर ठेवून ध्येय निश्चित करून आपली वाटचाल करणारा आणि घराला आपल्याकडूनही थोडासा आर्थिक हातभार लागावा म्हणून वडिलांसोबत पौरोहित्य करून आर्थिक अडचणींवर मात करीत आपले शिक्षण पूर्ण करणारा सुब्रमण्यम केळकर हा आयपीएस झाला आहे.
आई वडिलांचे आशीर्वाद, अपार मेहनत, प्रचंड कष्ट, राष्ट्रसेवा करण्याचे ध्येय आणि महापुरूषांचा आदर्श या सगळ््याच्या जोरावर सुब्रमण्यम आज इथपर्यंत पोहोचला आहे. पोलीस दलात सुब्रमण्यमसारखे राष्ट्रभक्त युवक जात आहेत. ही सर्व सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
सुब्रमण्यम आयपीएस झाल्याची बातमी झळकताच सोशल मीडियावरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सुब्रमण्यम याने मालवण तालुक्यातील चिंदरसारख्या ग्रामीण भागात राहून अडचणींना सामोरे जात रात्रीचा दिवस करून हे यश मिळविल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ते मोलाचे ठरले आहे. चिंदरसारख्या ग्रामीण भागात अजूनही धड मोबाईलचे नेटवर्कही व्यवस्थित मिळत नाही. मात्र या सर्वावर सुब्रमण्यमने मात केली आहे.
१० ते १२ तास अभ्यास करीत त्याने मिळविले यश
सुब्रमण्यम केळकर हा यूपीएससी परीक्षेत भारत देशातून ४९७ वा आला. ही परीक्षा त्याने मराठी माध्यमातून दिली होती. त्याने यूपीएससीसाठी वैकल्पिक विषय हा राजकीय विज्ञान निवडला होता. एका वसतिगृहात राहून त्याने परीक्षेची तयारी केली होती. यासाठी तो पुण्यातील चाणक्य मंडल परिवारमध्ये शिक्षण घेत होता. अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचा अभ्यास त्याने केला होता. १० ते १२ तास अभ्यास करीत त्याने यश संपादन केले होते.