‘त्या’ उपनिरीक्षकाच्या बडतर्फीच्या हालचाली
By admin | Published: June 13, 2014 01:38 AM2014-06-13T01:38:44+5:302014-06-13T01:44:17+5:30
लाचलुचपतच्या अहवालाची प्रतीक्षा : प्रशिक्षणार्थींना अधीक्षकांचे खडे बोल
सावंतवाडी : दोडामार्ग येथे काल, बुधवारी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेला राहुल कुमार दणाणे हा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक असल्याने त्याला सेवेतून बडतर्फ केले जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा चौकशीअंती होणार असून, सिंधुदुर्ग पोलीस सध्या लाचलुचपत विभागाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, दणाणे याला आज, गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक घेऊन यापुढे खबरदारी घेण्याची सक्त ताकीद दिली आहे. दोडामार्ग येथे काल राहुल कुमार दणाणे या प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते. या घटनेमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात एकच खळबळ माजली असून, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनीही गंभीर दखल घेतली आहे.
दणाणे हा प्रशिक्षणार्थी पोलीस आहे. त्याला सेवेत येण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी होता. असे असताना प्रशिक्षणार्थी सेवेच्या काळातच लाचलुचपतच्या गळाला अडकल्याने दणाणे याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याला अद्याप अधिकृत पोलीस सेवेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्याने शासनाला या कारवाईचा अधिकार आहे. (प्रतिनिधी)
चौकशीअंती निर्णय : साहू
राहुल दणाणे याच्या बडतर्फीबाबत अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना विचारले असता, आम्ही चौकशी समिती नेमणार असून, त्यानंतरच याबाबत अधिकृत कारवाई होणार आहे. दणाणे प्रशिक्षणार्थी अधिकारी होते. त्यामुळे अशी कारवाई होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.