बंडखोरी थोपवण्यात शिवसेनेला यश
By admin | Published: November 11, 2016 10:35 PM2016-11-11T22:35:06+5:302016-11-11T22:35:06+5:30
विद्यमान उपनगराध्यक्षांची अखेर माघार : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी; अन्नपूर्णा कोरगावकरांची बंडखोरी कायम
सावंतवाडी : विद्यमान उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी नगराध्यक्षपदासाठी केलेली बंडखोरी शमवण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, तर भाजपच्या अन्नपूर्णा कोरगावकर यांची प्रभाग ५ मधील बंडखोरी कायम आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मात्र त्यांनी मागे घेतला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाल्याची घोषणा शुक्रवारी केली आहे.
दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदाचे दोन, तर नगरसेवकपदाच्या दहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी सहा, तर नगरसेवकपदासाठी ६७ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. यात विद्यमान उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक सुदन्वा आरेकर यांची बंडखोरी शिवसेनेला चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक राजन पोकळे यांची मनधरणी करीत होते. अखेर अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजन पोकळे यांच्यासह नगरसेवक सुदन्वा आरेकर यांनी, तर प्रभाग ५ मधील गुरुप्रसाद मिशाळ यांनी आपली उमेदवारी मागे घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
तर भाजपच्या अन्नपूर्णा कोरगावकर यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, प्रभाग ५ मधील उमेदवारी अर्ज कायम ठेवत आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. काँग्रेसचे संजू शिरोडकर यांनी प्रभाग ३ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, शिरोडकर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्याने अखेर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपचे अधिकृत उमेदवार आनंद नेवगी यांना पाठिंबा दिला आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात प्रभाग २ मधून विशाल सावंत, प्रभाग ५ पाच मधून आॅगस्तीन फर्नांडिस प्रभाग ६ मधून अशोक पवार, प्रभाग ७ मधून मिथिलेश सुकी प्रभाग ७ मधून सुमेधा सावंत आदींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रभाग १ मधील रेहान खाजा व अर्शद बेग यांनी ही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार, तर नगरसेवकपदासाठी ६७ उमेदवार रिंग्ांणात उभे ठाकले आहेत. यात नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे संदीप कुडतरकर, भाजपचे मनोज नाईक, शिवसेनेचे बबन साळगावकर, तर अपक्ष म्हणून अॅड. बापू गव्हाणकर, प्रसाद पावस्कर व माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी काम पाहिले. तर तहसीलदार सतीश कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार व्दासे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अन्नपूर्णा कोरगावकरांसाठी मंत्री मैदानात
भाजपच्या विद्यमान महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर तसेच श्यामकांत काणेकर यांनी प्रयत्न केले, तर नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण हे स्वत: प्रांताधिकारी कार्यालयात आले होते. मात्र, कोरगावकर यांच्या बंडखोरीवर त्यांनी बोलण्यास नकार दिला.
काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण
शिवसेनेतील बंडखोरी शेवटच्या टप्प्यात शमली असली, तरी काँग्रेसमधील बंडखोरी मात्र कायम राहिली. ती थोपवण्यात काँग्रेसला यश आले नाही. यात प्रभाग ५ मधील अरूण भिसे, साक्षी वंजारी, वैष्णवी ठोंबरे तर प्रभाग ३ मधील राजू पनवलेकर यांचा यात समावेश आहे.