अवकाळीची नुकसान भरपाई परत जाणार
By admin | Published: March 24, 2016 09:51 PM2016-03-24T21:51:30+5:302016-03-25T00:02:09+5:30
संजय सामंत : स्थानिक प्रशासनावर जबाबदारी
सावंतवाडी : अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश शासनाने दिलेले असतानाही सावंतवाडी तालुक्यातील चार हजार शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. याला सर्वस्वी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भावई शेतकरी मंडळ झारापचे अध्यक्ष संजय सामंत यांनी केली आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शेतकरी यशवंत प्रभूतेंडोलकर, अमेय प्रभूतेंडोलकर, निरवडे गावचे सरपंच उत्तम पांढरे, आदी उपस्थित होते.
यावेळी सामंत म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या आहेत; पण त्यांचे निराकरण होत नाही. सावंतवाडीत तब्बल चार हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. यामुळे शासनाकडून आलेले सुमारे अडीच कोटी रुपये मागे जाऊ शकतात. ही नुकसान भरपाई मार्चपूर्वी देणे अपेक्षित असल्याचे सामंत यांनी सांगितले. वेंगुर्ले तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करण्यात आला. पण, सावंतवाडी तालुक्यात मात्र या उलट झाले आहे. ३० टक्के क्षेत्राचाच पंचनामा करण्यात आला आहे.
त्यामुळे ही नुकसान भरपाई फक्त ३० टक्केच मिळणार आहे. शासनाने सामाईक खातेदाराबाबत नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. तसेच या निर्देषानुसारच ही नुकसान भरपाई द्या, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही अद्याप ६० टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पोहोचली नाही. हे दुर्दैव आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी आमची बैठकही घेतली. त्या बैठकीत स्थानिक प्रशासन म्हणजेच तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्या चुकीच्या धोरणामुळेच ही नुकसान भरपाई मिळाली नाही. यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले असतानाही अद्यापपर्यंत हा अन्याय दूर करण्यात आला नाही.
सावंतवाडी तालुक्यातील ४२६८ शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असल्याने त्यावर तातडीने निर्णय व्हावा. याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आम्ही लक्ष वेधणार असून त्यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)