सुदेश आचरेकर यांना दोन वर्षे कारावास

By admin | Published: July 1, 2015 12:20 AM2015-07-01T00:20:14+5:302015-07-01T00:20:14+5:30

सरकारी कामात अडथळा प्रकरण : आचरेकर मालवणचे माजी नगराध्यक्ष

Sudesh Achrekar gets imprisonment for two years | सुदेश आचरेकर यांना दोन वर्षे कारावास

सुदेश आचरेकर यांना दोन वर्षे कारावास

Next

मालवण : मालवण नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीवेळी मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालवण न्यायालयाने माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या सर्व शिक्षा त्यांनी एकत्रित भोगावयाच्या असल्याचेही न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मालवण नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी २९ जून २०१४ रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यादिवशी पोटनिवडणुकीकरिता उभ्या असलेल्या उमेदवार स्नेहा सुदेश आचरेकर वयस्कर महिलेस मतदानकेंद्रात घेऊन जात होत्या. बंदोबस्तावरील परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक कलगोंडा रघुनाथ पाटील (वय २९) यांनी त्यांना उमेदवार मतदारांना मतदानकेंद्रात नेऊ शकत नाही, अशी सूचना केली. त्याचवेळी स्नेहा आचरेकर यांचे पती व तत्कालीन नगराध्यक्ष सुदेश आचरेकर हे उपनिरीक्षक पाटील यांच्या अंगावर धावून आले व बंदोबस्ताच्या कर्तव्यात दहशतीने अडथळा करून धमकी दिली व पाटील यांचे न ऐकता वयस्कर महिलेस मतदान केंद्रात घेऊन गेले. उपनिरीक्षक पाटील यांनी त्याबाबत मालवण पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर तत्कालीन नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा मंगळवारी दिवाणी न्यायाधीश संतोष चव्हाण यांनी निकाल जाहीर केला. गुन्ह्यात सुदेश आचरेकर हे दोषी आढळून आले. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. सतीशकुमार धामापूरकर यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, आचरेकर यांनी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने तो मंजूर केला आहे. (प्रतिनिधी)


वेगवेगळ््या गुन्ह्यांमध्ये शिक्षा
न्यायालयाने दिलेल्या निकालात आचरेकर यांना १ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड भरावयाचा आहे. तसेच तीन महिने साधा कारावास व ५०० रुपये दंड भरावयाचा आहे. दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावास भोगावयाचा आहे. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात १ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड भरावयाचा आहे. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास भोगावयाचा आहे. या सर्व शिक्षा आचरेकर यांनी एकत्रित भोगावयाच्या आहेत, असेही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Sudesh Achrekar gets imprisonment for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.