सुधा मूर्ती देवगड दौऱ्यावर, कुणकेश्वराचे घेतले दर्शन
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 9, 2022 01:02 PM2022-11-09T13:02:51+5:302022-11-09T13:22:58+5:30
देवगडला आगमन झाल्यावर त्यांनी श्री देवकुणकेश्वराचे दर्शन घेतले.
सिंधुदुर्ग : इन्फोसिसच्या माजी अध्यक्ष, सुप्रसिद्ध लेखिका पद्मश्री सुधा मूर्ती यांनी कुणकेश्वर क्षेत्र भेट देऊन कुणकेश्वराचे दर्शन घेतले. सुधा मूर्ती या देवगड दौऱ्यावर असून बापार्डे येथील महाविद्यालयाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होत आहे. काल, मंगळवारी देवगडला आगमन झाल्यावर त्यांनी श्री देवकुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकारीऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
मंगळवारी (दि.७) सुधा मूर्ती आणि त्यांच्या भगिनी मंगला कुलकर्णी यांनी कोल्हापुरातील दोन दिवसांच्या मुक्कामात रंकाळा, अंबाबाईचे दर्शन तर घेतले. तर, ७० वर्षांपूर्वी आपले बालपण जिथे गेले, त्या घरास भेट देत आठवणींची पानं उलगडली.
कुरुंदवाडमधील घरीही दिली भेट
मोडकळीस आलेले वासे, तुळ्या आणि लोंबकळणारी जळमटं यातून वाट काढत सुधा मूर्ती यांनी कुरुंदवाड येथील आपल्या घराची पाहणी करीत आठवणींना उजाळा दिला. माझे घर, येथील जिव्हाळा कधीच विसरू शकत नाही, कोल्हापूरची कन्या असल्याचा सार्थ अभिमान आहे, अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. त्यांनी नृसिंहवाडीतील श्रीदत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.
सांगलीतील मुलाखतीत वाचकांशी दिलखुलास संवाद
‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात अनुवादक लीना सोहनी यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत सुधा मूर्तींनी वाचकांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आणि टेल्कोतील पहिली महिला इंजिनीअर ते प्रख्यात लेखिका हा प्रवास त्यांनी उलगडला.