सर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट :उपरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:14 PM2019-02-16T12:14:44+5:302019-02-16T12:20:26+5:30
राजकर्त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामान्य जनतने याबाबत उठाव करणे गरजेचे आहे असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट झाला आहे. परप्रांतीयांच्या या घुसखोरी धोरणामुळे जिल्ह्यातील तरुण व्यावसायिक हतबल झाले आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार निवेदने आणि पत्रव्यवहार करण्यात आला आहे. राजकर्त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामान्य जनतने याबाबत उठाव करणे गरजेचे आहे असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परशुराम उपरकर पुढे म्हणाले, कणकवली तालुक्यातील काही तरुण मोबाईल विक्रेते यांनी आपल्याला निवेदन देत आपली व्यथा मांडली आहे.
कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही परप्रांतीय मोबाईल व्यावसायिक ठाण मांडू पाहत आहेत. ग्राहकांना आमिषे दाखवून आपल्या दुकानाकडे आकर्षित करण्याचे काम हे व्यावसायिक करत आहेत. धनाडय परप्रांतीय व्यावसायिक स्थानिक व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद करून आयुष्यातून उठवून पाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मोबाईल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
मोबाइल व्यवसायाव्यतिरिक्त कपडे, बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर,टेलरिंग व्यवसाय, केशकर्तनालय यांसारखे अनेक व्यवसाय परप्रांतीय करत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यवसाय करणारे तरुण आणि व्यावसायिक हतबल झाले आहेत. आता मुंबईतील मराठी प्रमाणेच जिल्ह्यातील मालवणी माणसांचा टक्का कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
असेच चित्र राहिले तर काही दिवसात नोकरी किंवा कोणताही व्यवसाय नसल्यामुळे जिल्ह्यातील भावी पिढी वाममागार्ला जाण्याची भीती आहे. त्यामुळे या परप्रांतीय व्यावसायिकांना जिल्ह्यातील जनतेने आणि तरुणांनी हद्दपार करावे असे आवाहन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करत आहोत असेही यावेळी उपरकर म्हणाले.
सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष !
परप्रांतीयांच्या होणाऱ्या आक्रमणाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिक युवक बेरोजगार होत आहेत. सिंधुदुर्गात येऊन परप्रांतीय आपली वस्ती वाढवत आहेत. तसेच आपली प्रार्थनास्थळेही उभारत आहेत. त्यांच्या अशा कृत्यामुळे भविष्यात स्थानिकांबरोबर तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.