ऊसतोडणी पाळीपत्रकानुसारच केली जाईल : सतीश सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 01:56 PM2020-10-12T13:56:37+5:302020-10-12T14:00:48+5:30
Sugar factory, sindhdudurgnews, साखर कारखान्याचे अधिकारी २५ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ऊस क्षेत्राची पाहणी करून तोडणी सुलभ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सुचना करतील. त्यानंतर पाळीपत्रक निश्चित करून ऊस तोडणी केली जाईल. वशिलेबाजीवर अजिबात तोडणी करू नये अशी सूचना कारखाना व्यवस्थापनाला केली असून जिल्ह्यातील एकाही ऊस उत्पादक शेतकऱ्यावर तोडणीच्या बाबतीत अन्याय होऊ देणार नाही, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केले.
वैभववाडी : साखर कारखान्याचे अधिकारी २५ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ऊस क्षेत्राची पाहणी करून तोडणी सुलभ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सुचना करतील. त्यानंतर पाळीपत्रक निश्चित करून ऊस तोडणी केली जाईल. वशिलेबाजीवर अजिबात तोडणी करू नये अशी सूचना कारखाना व्यवस्थापनाला केली असून जिल्ह्यातील एकाही ऊस उत्पादक शेतकऱ्यावर तोडणीच्या बाबतीत अन्याय होऊ देणार नाही, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील कार्यालयात पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे अधिकारी आणि बँकेच्या संचालकांची ऊस तोडणी नियोजनाबाबत बैठक झाली. त्यानंतर सावंत यांनी ही माहिती दिली.
यावेळी बँकेचे संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, अनिरुद्ध देसाई, कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील, एस. एस. पवार, ऊस विकास अधिकारी एस. एस. पाटील, बँकेचे शाखाधिकारी सर्जेराव यादव आदी उपस्थित होते.
सावंत पुढे म्हणाले, गेल्या हंगामात जिल्ह्यातून ८३ हजार टन ऊस डी. वाय. पाटील कारखान्याला शेतकऱ्यांनी घातला. या ऊसाची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. यावर्षीही ऊसतोडणी नियोजनबध्द व्हावी; या हेतूने कारखान्याच्या अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक बैठक झाली.
ऊसतोडणी करताना अनेक अडचणी येतात. त्याअनुषंगानेही चर्चा झाली. काही शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये तण असते. त्यामुळे तोडणीमध्ये अडचणी येतात. त्यासाठी कारखान्याचे अधिकारी २५ आॅक्टोबरपर्यंत ऊसक्षेत्राची पाहणी करणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये तण असेल त्यांना तणनाशक फवारणीच्या सूचना केल्या जातील. त्यानंतर १२ महिने पूणृ झालेल्या ऊस तोडणीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.
एफआरपीपेक्षा जादा दराची शक्यता
यावर्षी ऊस तोडणी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे तोडणीला उशिरा सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणे यावर्षीही दर दिला जाईल. याशिवाय प्रतिटन अधिक १०० रुपये दर मिळण्याची शक्यता आहे, असे मत सतीश सावंत यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन
पाळीपत्रक तयार झाल्यानंतर ते कारखान्याच्या गट कार्यालयात लावण्यात येणार आहे. त्याचबरोबरच तोडणीविषयीची माहिती गावच्या सेवा सोसायट्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना काही सूचना किंवा हरकती नोंदवायच्या असतील तर त्याही नोंदवून घेतल्या जातील.
याशिवाय जिल्हा बँकेच्या तालुका कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना हरकती नोंदविता येणार आहेत. कोणत्याही परिस्थिती वशिलेबाजीने ऊसतोडणी करू नये, अशी सुचना कारखान्याच्या संचालकांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेतकºयांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.