सुहास कांबळे यांना सशर्त जामीन मंजूर
By admin | Published: April 3, 2016 03:50 AM2016-04-03T03:50:15+5:302016-04-03T03:50:18+5:30
रत्नागिरीबाहेर न जाण्याची अट : हजेरी लावण्याचा आदेश
रत्नागिरी : ठेकेदाराची बिले मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले बीएसएनएलचे महाप्रंबधक सुहास कांबळे व चालक तन्वीर बागवान यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय रत्नागिरीच्या बाहेर न जाण्याच्या अटींसह इतर सशर्त अटींवर शनिवारी जामीन मंजूर करण्यात आला.
सुहास कांबळे हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दूरसंचार विभागाचे महाप्रबंधक आहेत. नेहमीच्या कंत्राटी कामातील एका ठेकेदाराचे ७० लाख रुपयांचे बिल गेल्या काही दिवसांपासून त्याला मिळाले नव्हते. या बिलासाठी तो ठेकेदार अनेकदा दूरसंचारच्या कार्यालयाचे हेलपाटे मारत होता, परंतु त्याचे काम होत नव्हते. त्यामुळे त्या ठेकेदाराने सुहास कांबळे यांची भेट घेतली.
त्यावेळी कांबळे यांनी ७० लाखांची ही रक्कम मिळावी, यासाठी ३ टक्के अर्थात तीन लाख रुपये लाच मागितली. त्यानुसार ठेकेदाराने तीन टक्के रक्कम म्हणजेच तीन लाख रुपये देण्याचे तयारी दर्शविली. त्यानंतर मुंबई सीबीआयकडे तक्रार केली. त्यानुसार मुंबई सीबीआयने कांबळे व तन्वीर बागवान यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, त्यानंतर सीबीआयने सुहास कांबळे यांच्या घरी छापा टाकून खाते पुस्तके तपासली असता सुहास कांबळे यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर सुहास कांबळे व तन्वीर बागवान यांचे झालेले संभाषणही रेकॉर्ड करण्यात आले असल्याचे समजते. सुहास कांबळे यांनी कंपनीतील बरीच कामे मर्जीतील ठेकेदारांना दिल्याचे समजते.
शुक्रवारी सुहास कांबळे व तन्वीर बागवान यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. त्या अर्जावर न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. सुहास कांबळे यांना ५० हजारांचा डिपॉझीट करार, त्याचबरोबर सलग दोन दिवस मंगळवार व बुधवारी सीबीआय मुंबई येथे हजेरी लावणे, तसेच रत्नागिरी सोडण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेण्याचा अटींवर जामीन मंजूर करण्यात आला.
तन्वीर बागवान याला ३० हजार डिपॉझिट करार व मंगळवार, बुधवारी सीबीआय कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. (वार्ताहर)