उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबीराला सिंधुदुर्गात प्रतिसाद
By admin | Published: May 6, 2017 05:34 PM2017-05-06T17:34:17+5:302017-05-06T17:34:17+5:30
ट्रॅकसूट, शूज व खेळाच्या पोशाखाचे वाटप
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. 0६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राअंतर्गत शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर येथे उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन २0 ते ३0 एप्रिल २0१७ पर्यंत सकाळी व सायंकाळी या दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षण शिबीराचे उद्धाटन अमरसेन सावंत, जिल्हा परिषद सदस्य व संस्थेचे चेअरमन शशिकांत अणावकर यांच्या हस्ते झाले. या कार्यालयास सचिव आप्पा गावडे, डॉ. गाडेकर, सावंत व प्रशालेचे शिक्षक वृंद उपस्थित होते.
या शिबीरात जिल्ह्यातील डॉन बास्को हायस्कूल ओरोस, प्राथमिक शाळा कसाल व शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर या संस्थेतील ६0 खेळाडूंनी सहभाग घेतला होतो. या शिबीरात राष्ट्रीय मार्गदर्शक उदय पवार यांचे तत्रशुध्द मार्गदर्शन लाभले खेळाडूंना शारिरीक तदुरुस्ती, आहार व हॉकी क्रीडा प्रकारातील कौशल्ये व सराव खेळाडूंकडून करुन घेण्यात आला. रोज खेळाडूंना क्रीडा कार्यालयामार्फत दूध, अंडी, केळी यांचा सकस आहार देण्यात आला.
प्रशिक्षण शिबीराचा समारोप जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर व हॉकी महाराष्ट्र संघटनेचे सचिव किरण रेडकर यांच्या हस्ते झाला. उपस्थित सर्व खेळाडूंना प्रशिक्षण केंद्राअंतर्गत कार्यालयामार्फत ट्रॅकसूट, शूज व खेळाच्या पोशाखाचे वाटप करण्यात आले.
भुमी नाईक, समिधा पारकर व अथर्व अणावकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुलांनी खेळाचे महत्व ओळखून या खेळात कौशल्य संपादन करुन आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे तसेच राष्ट्रीय स्तरावर नाव चमकावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक संजय मालवणकर, उदय पवार, धुरी सर, बोवलेकर मॅडम, रितेश साळगांवकर, सिध्दांत रायकर उपस्थित होते.