सिंधुदूर्गातील घरे होणार पुन्हा सुनी सुनी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:02 AM2019-09-09T11:02:43+5:302019-09-09T11:06:14+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणात गणेशोत्सवाला फार महत्व आहे. या गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले होते. काही चाकरमान्यांची बंद असलेली घरे या उत्सवाच्या निमित्ताने उघडली गेली होती. त्यामुळे एरव्ही नीरव शांतता असलेल्या घरात तसेच वाडी वाड़ित पर्यायाने गावात सगळीकडे माणसांच्या आवाजाचा किलबिलाट ऐकू येत होता.
सुधीर राणे
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणात गणेशोत्सवाला फार महत्व आहे. या गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले होते. काही चाकरमान्यांची बंद असलेली घरे या उत्सवाच्या निमित्ताने उघडली गेली होती. त्यामुळे एरव्ही नीरव शांतता असलेल्या घरात तसेच वाडी वाड़ित पर्यायाने गावात सगळीकडे माणसांच्या आवाजाचा किलबिलाट ऐकू येत होता.
गणेशोत्सवा अंतर्गत दीड, पाच , सात , नऊ, अकरा दिवसांच्या गणरायाना पारंपारिक पध्दतीने निरोप दिल्यानंतर सिंधुदुर्गात आलेले चाकरमानी टप्प्या टप्प्याने आपल्या कामा धंद्याच्या ठिकाणी परतू लागले आहेत. गावातील घरात कोणीच रहाणारे नसल्याने पुन्हा घराला कुलुप घालून हे चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गजबजलेली घरे पुन्हा सुनी सुनी होऊ लागली आहेत.
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने सिमेंट आणि मातीची उडणारी धूळ, प्रचंड उकाडा आणि सर्वच रेल्वे गाड्यांना होणारा दोन ते अडीच तासाचा विलंब अशा विघ्नांवर मात करीत हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले होते. आपल्या लाडक्या गणरायांच्या दर्शनासाठी आंतरिक तळमळीने चाकरमान्यांची गावाकडे येण्याची ओढ़ लक्षवेधि अशीच होती.
सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा, आरोग्य विभाग , प्रशासन आणि वाहतूक शाखेने चोख व्यवस्था ठेवली होती. याखेरीज महामार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही देखील करण्यात आली होती. तरीही अनंत अड्चणींचा सामना चाकरमाण्याना आपल्या घरा पर्यन्त पोहचेपर्यन्त करावा लागला. त्यात यावर्षी जोरदार पडणाऱ्या पावसाने मोठी अडचण निर्माण केली होती. रस्ते पुन्हा खराब झाले आहेत.
गणेशोत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने कोकणात दाखल होणार असल्याने कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेच्या विशेष फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, या मार्गावर कोसळलेली दरड तसेच जोरदार पाऊस यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. त्यांना रेल्वे सोडून प्रवासासाठी अन्य पर्याय निवडावे लागले.
एस.टी.महामंडळाकडून २२००गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. एस.टी.मधून साधारणतः एक लाख तर रेल्वेतून तीन लाख प्रवासी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्गावरून खासगी बस आणि स्वतःच्या तसेच भाड्याच्या चारचाकी वाहनातून २५ हजार चाकरमान्यांचे आगमन झाल्याचा वाहतूक पोलिसांचा कयास आहे. या आकडेवारित मोठी तफावत असण्याचीही शक्यता आहे. मात्र गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी प्रमाणेच सिंधुदुर्गात दाखल झाले होते.
२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एस टी च्या जादा गाड्या सिंधुदुर्गात दाखल झाल्या असल्याची माहिती एस.टी.च्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याखेरीज खासगी बसेस आणि शेकडो वाहनांतून चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर सर्वच बाजारपेठांत प्रचंड उलाढाल वाढली होती. गणपती सजावटीच्या साहित्याबरोबरच फटाके, शोभेच्या वस्तू, देशी आणि चीनी बनावटीची तोरणे, किराणा दुकाने, कापड दुकाने, नैवेद्याचे साहित्य विक्री करणारे दुकानदार तसेच फिरत्या फळ भाजी विक्रेत्यांकडे मोठी गर्दी होती. जिल्ह्यातील विविध बाजारपेठांत कोट्यवधीची आर्थिक उलाढाल झाली आहे.
यंदा वाढत्या महागाईमुळे अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली होती . त्याचाही परिणाम विविध वस्तूंच्या खरेदीवर झाल्याचे चित्र होते. मात्र काटकसरिचा अवलंब करीत गणेश भक्तानी आवश्यक साहित्य खरेदी केले. जोरदार बरसणाऱ्या पावसानेही ग्राहकांना बाजारपेठेत येण्यापासून रोखल्याने व्यापाऱ्यांच्या धंद्यावर काहीसा परिणाम झाला. पाऊस थांबायचे नावच घेत नसल्याने अनेक मुंबईकर मंडळींनी लवकर गणरायाला निरोप देऊन परत मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला.
गणेशोत्सवात बाजारासाठी ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक दाखल होत असल्याने, सर्वच एस.टी.च्या गाड्या फुल्ल असल्याचे दिसून येत होते. याखेरीज तीन आसनी रिक्षा आणि खासगी वाहनांचा व्यवसाय तेजीत आला होता . प्रमुख मार्गावरील बसेसमध्ये पाय ठेवण्यास जागा नसल्याने जादा एस.टी.बसेस सोडण्याचीही मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत होती. याबाबत एस.टी.च्या अधिकाऱ्याकडून सकारात्मकता दाखवून कार्यवाही करण्यात आली.
कोकण रेल्वेकडूनही सज्जता !
गणेशोत्सवात रेल्वे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनानेही रेल्वे मार्गावर गस्त वाढविली होती. त्याचबरोबर सर्वच गाड्यांमध्ये पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती . सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी आणि कणकवली या रेल्वे स्थानकांतून प्रवासी उपलब्धतेनुसार एस.टी.बसेस देखील सोडल्या जात होत्या . त्याचा फायदा चाकरमान्याना झाला. मात्र, गाड्यांचे वेळापत्रक अनेक वेळा कोलमडले होते.
एस टीची ऑनलाइन आरक्षण व्यवस्था !
गणेशोत्सवासाठी एस टी ने जादा गाड्या मुंबई , पुणे आदी भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोडल्या होत्या. तर परतीच्या प्रवासासाठीही गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. एस टी ने ऑनलाईन आरक्षण व्यवस्था सुरु केल्याने त्याचा फायदा चाकरमाण्याना घेता आला. याशिवाय विशिष्ट गावातून ग्रुप बुकिंगची सोयही उपलब्ध करून देण्यात आली होती. याचाही फायदा चाकरमाण्याना झाला. ७ सप्टेंबर पर्यंत परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या १९४ गाड्यांचे बुकिंग झाले होते.
यामध्ये ७ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या २६ गाड्या, ८ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या ७६ गाड्या, ९ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या ५१ गाड्या, १० सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या १९ गाडयांचा समावेश आहे. तसेच ११,१२,१३ सप्टेंबर व पुढील दिवशीही जादा गाड्या सुटणार असून त्यांचे आरक्षण सुरू आहे. त्याशिवाय मुंबई, पुणे या भागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन जाणाऱ्या नियमित गाड्या सुरूच आहेत. काही हंगामी गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
चाकरमाण्याना गर्दीचा फटका !
सिंधुदुर्गात दाखल झालेल्या काही चाकरमाण्यानी परतीच्या प्रवासासाठी रेल्वे तसेच एस टी व लक्झरी बसेसचे आगावू आरक्षण करून ठेवले होते. मात्र अनेक चाकरमाण्यानी मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी येणे पसंत केले होते. त्यामुळे परतीच्या प्रवासाच्या वेळी रेल्वेला प्रचंड गर्दी होती.दिवा पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, राज्यराणी , कोकण कन्या एक्सप्रेस व मंगलोर एक्सप्रेस या नियमित रेल्वे गाड्याही फुल्ल होत होत्या. तसेच जादा रेल्वेच्या गाड्याही फुल्ल झाल्याने अनेक प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागला.
कोकणी माणसाचे सणांशी घट्ट नाते !
कोकणी माणूस आणि सण यांचे नातं अगदी अतूट राहिलेलं आहे. प्रत्येक सण कोकणात मोठ्या उत्साहाने, भक्तीभावाने आणि विधिवत साजरा केला जातो. कोकणात दिवाळी, तुलशी विवाह, शिमगोत्सव, गणेशोत्सव, नारळी पोर्णिमा, स्थानिक जत्रौत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. यातील सर्वात मोठा आणि घरादाराचे रंगरूप बदलणारा एक आगळावेगळा सण म्हणजे गणेशोत्सव! गणेशोत्सव म्हटला की, कोकणातील कुणीही कुठेही व्यवसाय, नोकरीनिमित्त जगभरात असला तरीही तो या उत्सवासाठी घराकडे आल्याशिवाय राहत नाही. या उत्सव काळातील वातावरण भारलेले असते. या उत्सवाच्या निमित्तानेच कोकणी माणसांच्या मनाची श्रीमंतीही दिसते आणि उपजत असलेल्या अमाप उत्सवी स्वभावाचेही दर्शन होते.
कोकणातील गणेशोत्सव पाहिला तर तो भक्तीभावाने आदरपूर्वक साजरा केला जातो. लहानांपासून थोरामोठ्यांमध्ये उत्साहाचे उधाण आणणारा सण म्हणून कोकणातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सव कालावधीत घराघरांत चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण असते. गणेश पूजनाचे ठिकाण ठरलेले असते. किंबहुना घर बांधते वेळीच तशी सोय केलेली असते. अनेक कुटुंबे पारंपारीक पध्दतीने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. अनेक ठिकाणी विभक्त कुटुंबे असली किंवा नोकरी-धंद्यानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाली असली तरीसुद्धा आपल्या मूळ गावी गणेशोत्सवासाठी भाविक येत असतात.
गणेशोत्सवासाठी आपापल्यापरीने खर्च केला जातो. वर्गणी काढून किंवा आळीपाळीने प्रत्येक वर्षी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. आणि गणेश मूर्तीच्या विसर्जना नंतर पुढच्या वर्षी गणरायानी लवकर यावे असे म्हणत आतुरतेने त्याची वाट पाहिली जाते. गावी येताना कितीही त्रास झाला तरीही पुन्हा पुढच्या वर्षी तितक्याच उत्साहाने भाविक चाकरमानी आपल्या गावी येत असतात. यातून कोकणी माणसाचे सणांप्रती असलेले घट्ट नातेच दिसून येत असते.
---- फोटो ओळ-- कणकवली बसस्थानकात एसटी च्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.