सुपारी बागायतदार आर्थिक संकटात
By admin | Published: November 25, 2015 11:17 PM2015-11-25T23:17:33+5:302015-11-25T23:17:33+5:30
पावसामुळे भातपिक गेले : बुरशी रोगाने सुपारी पिक नेले, शासनाने मदत करण्याची मागणी
वैभव साळकर ल्ल दोडामार्ग
चालूवषी आॅक्टोबर अखेरपर्यंत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाच्या कहरामुळे दोडामार्ग तालुक्यात ‘बळीराजा’ बरोबरच सुपारी बागायतदारही पुरता कोलमडून गेला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत अविरत कोसळणाऱ्या पावसाने बळीराजाचे ‘भातपिक’ धुळीस मिळविले. तर लांबलेल्या पावसामुळे सुपारीवर ‘बुरशी जन्य’ रोगाने थैमान घातल्याने सुपारी पिकही वाया गेले आहे. त्यामुळे सर्वस्वी शेतीवरच अवलंबून असलेला दोडामार्ग तालुक्यातील बळीराजा आणि बागायतदार वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला सावरण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योग-धंद्याच्या बाबतीत मागासलेला तालुका म्हणजे दोडामार्ग होय. अर्थात उद्योग-धंद्यात जरी हा तालुका मागे असला तरी याच तालुक्यात भातशेती आणि सुपारी पिक सर्वाधिक घेतले जाते. दोडामार्ग तालुक्याचा खऱ्या अर्थाने आर्थिक कणा ‘शेती-बागायती’ राहिला आहे. मात्र चालूवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे हा कणाच कोलमडल्याचे चित्र आहे. लांबलेल्या आणि अवकाळी पावसाने दोडामार्गमधील बळीराजाला आणि बागायतदाराला पुरते हैराण केले आहे. लांबलेल्या पावसाने चालूवर्षी प्रचंड प्रमाणात दर्जेदार भातशेती करूनही येथील शेतकऱ्यांच्या हाती काहीही राहिलेले नाही.
दोडामार्ग तालुक्यात आॅक्टोबरच्या सुरवातीपासूनच दरवर्षी भातकापणीला सुरवात होते. जून ते जलै महिन्यात दरवर्षी पेरणी व लावणी झाल्यानंतर अवघ्या तीन ते साडेतीन महिन्याची भातपिके सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात परिपक्व होतात. त्याच अंदाजाने तालुक्यात पारंपरीक पद्धतीने मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अलिकडच्या काही वर्षात दर्जेदार भातशेती केली जाते. चालूवर्षी तर शासनाने १०० टक्के अनुदानावर भात बियाणांचे वाटप केल्याने तालुक्यात भातशेती क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली होती. तर दर्जेदार संकरीत भात बियाण्यांमुळे आणि सुरवातीपासूनच सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीही चांगली झाली होती. त्यामुळे यावर्षी विक्रमी उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा शेतकऱ्यांचा प्रयत्न पावसाने हाणून पाडत शेतकऱ्यांवर चक्क उपासमारीची वेळ आणली.
आॅक्टोबर सुरुवातीपासून पिकलेल्या भाताची आॅक्टोबरअखेर पर्यंत पाऊस पडल्याने भात कापणी झाली नाही. त्यामुळे सुरवातीला भातशेतीचे नुकसान झाले. तर त्यानंतर नोव्हेंबरपासून पावसाने उसंत घेतल्याने भात कापणी सुरू झाली. मात्र, अधुन-मधून पाऊस कोसळल्याने काही ठिकाणी कापणी केलेली भातशेती जाग्यावरच कुजली, नव्हे तर चक्क कापणी केलेल्या भात पिकाच्या आडवांना कोंब आले. शिवाय भात कापणी लांबल्याने उरले-सुरले भातपिकही जाग्यावरच गळून पडले. एकूणच येथील बळीराजाच्या हाती आता नुसत्या गवतापलिकडे काहीही राहीलेले नाही. त्यामुळे शासन स्तरावर त्याचा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे.