पोलीस अधीक्षकांकडून कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 06:54 PM2021-01-01T18:54:23+5:302021-01-01T18:55:46+5:30
कुडाळ : मुंबई येथून कोकणकन्या एक्स्प्रेसने कुडाळ येथे आलेल्या व कुडाळ बसस्थानकात मध्यरात्रीपर्यंत उशिरा बसून राहिलेल्या एका वृद्ध महिलेला ...
कुडाळ : मुंबई येथून कोकणकन्या एक्स्प्रेसने कुडाळ येथे आलेल्या व कुडाळ बसस्थानकात मध्यरात्रीपर्यंत उशिरा बसून राहिलेल्या एका वृद्ध महिलेला कुडाळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई अर्चना कुडाळकर, इतर पोलीस व होमगार्ड यांनी सुरक्षितरित्या तिच्या नातेवाईकांकडे सुपुर्द केले. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार कुडाळ पोलीस ठाण्यात केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई येथील सुमन मांडवकर (६१) या वृध्द महिलेचे माहेर बिबवणे येथे असून, बिबवणे येथे येण्यासाठी त्या बुधवारी सकाळी कोकणकन्या एक्स्प्रेसने कुडाळ रेल्वे स्टेशनवर उतरल्या. तिथून त्या कुडाळ बसस्थानकात आल्या. त्यानंतर तिला माहेरी जायचे न समजल्याने ती दिवसभर कुडाळ बसस्थानकात बसून राहिली. त्यानंतर रात्र झाली तरीही ती तिथेच बसून होती.
यादरम्यान रात्री पोलीस गस्त घालत असणाऱ्या महिला पोलीस अर्चना कुडाळकर यांनी रात्री १ वाजण्याच्या सुमारास कुडाळ एसटी स्थानकात येऊन पाहणी केली असता, सुमन मांडवकर ही महिला थंडीने कुडकुडत असताना दिसून आली. त्यामुळे ही महिला एकटीच बसून येथे काय करते? तिचे घर कुठे आहे?. तिला मदत मिळावी याकरिता तिच्याकडे जात विचारपूस केली असता, तिने बिबवणे येथे धुरी यांच्याकडे जायचे आहे, एवढेच सांगितले, मात्र तिला नेमकी माहिती देता येत नव्हती. त्यानंतर अर्चना यांनी बिबवणे पोलीस पाटील शैलेश राऊळ यांना संपर्क करीत त्या महिलेचे माहेर गाठले व त्यानंतर तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
प्रसंगावधान ओळखून महिला पोलीस अर्चना कुडाळकर व इतर पोलीस व होमगार्ड यांनी केलेल्या कर्तव्याची माहिती राजेंद्र दाभाडे यांना मिळताच गुरुवारी सकाळी कुडाळ पोलीस ठाणे येथे येत महिला हेड कॉन्स्टेबल अर्चना कुडाळकर, चालक व पोलीस शिपाई एस. डी. कदम, महिला होमगार्ड जना नेरूरकर, होमगार्ड दीपक परब, बिबवणे पोलीस पाटील शैलेश राऊळ या सर्वांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पोलीस निरीक्षक शंकर कोरे उपस्थित होते.