बायोमॅट्रीक प्रणाली बाबत पुरवठा विभागाने प्रशिक्षण द्यावे : दीपक केसरकर
By admin | Published: July 8, 2017 03:12 PM2017-07-08T15:12:55+5:302017-07-08T15:12:55+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा पुरवठा दक्षता समितीच्या बैठकीत सूचना
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी दि. ८ : सर्व रास्त भाव धान्य दुकानातून बायोमॅट्रीक प्रणाली सुव्यवस्थित सुरु होण्याबाबत धान्य दुकानदारांची कार्यशाळा आयोजित करुन पुरवठा विभागाने बायोमॅट्रीक प्रणालीचे प्रशिक्षण द्यावे अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित जिल्हास्तरीय पुरवठा दक्षता समितीच्या बैठकीत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरसिंह, समिती सदस्य स्नेहा तेंडुलकर, राजश्री धुमाळे, भावना कदम, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा उपनिबंधक मेघा वाके, जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत आदी उपस्थित होते.
उज्वला लाभधारकांना धान्याचा लाभ मिळणार
समिती सदस्या राजश्री धुमाळे यांनी या बैठकीत उज्वला अंतर्गत गॅस लाभधारक हे कनेक्शन घेण्यास तयार होत नाहीत. हे गॅस कनेक्शन घेतले तर धान्य मिळणार नाही असा त्यांचा समज आहे, अशी माहिती बैठकीत सांगितली. या बाबत पालकमंत्री केसरकर यांनी उज्वला गॅस अंतर्गत गॅस कनेक्शन घेतले तर केवळ त्यांना रॉकेल मिळणार नाही, पण नियमानुसार शिधापत्रिकेतील धान्याचा कोटा त्यांना मिळणार आहे. याबाबत उज्वला गॅस कनेक्शन मंजूर झालेल्या सर्व लाभधारकांनी गॅस कनेक्शन घ्यावे असे आवाहन त्यांनी या बैठकीत केले.
पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकान दारांची बैठक आयोजित करावी, गॅस एजन्सी यांनी त्यांचे दुकानात उज्वला गॅस कनेक्शन लाभधारकांच्या माहितीसाठी माहिती फलक लावावेत. आंगणवाडीसाठी धान्य पुरवठा जादा दराने केला गेला आहे. या बाबत त्यांना फरकाची रक्कम देण्याबाबत पुरवठा विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, फोंडा येथील घाऊक धान्य गोदाम दुरुस्ती प्रस्ताव सादर करावा, रॉकेल विक्रेत्यांनी फ्री सेल कोटा ठेवणे आवश्यक आहे. याबाबत पुरवठा विभागाने घाऊक रॉकेल विक्रेत्यांना सूचना द्याव्यात आदी सूचना या बैठकीत पालकमंत्री केसरकर यांनी केल्या.
जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांनी प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन मागिल बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन केले.