कावले कुटुंबीयांना ग्रामस्थांकडून आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:37 PM2019-08-23T12:37:44+5:302019-08-23T12:40:20+5:30
मालवण तालुक्यातील हडी येथील कावले कुटुंबीयांचे घर पूर्णत: आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याबाबत गावातील ग्रामस्थांनी छप्पर दुरुस्तीसाठी तातडीची मदत म्हणून आवश्यक साहित्य देऊन मोलाचा हातभार लावला. तर प्रशासनाकडून घराचा पंचनामा करण्यात आला असून शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही सरपंच महेश मांजरेकर यांनी दिली.
मालवण : तालुक्यातील हडी येथील कावले कुटुंबीयांचे घर पूर्णत: आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याबाबत गावातील ग्रामस्थांनी छप्पर दुरुस्तीसाठी तातडीची मदत म्हणून आवश्यक साहित्य देऊन मोलाचा हातभार लावला. तर प्रशासनाकडून घराचा पंचनामा करण्यात आला असून शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही सरपंच महेश मांजरेकर यांनी दिली.
हडी शाळा क्रमांक दोन येथे कावले कुटुंबीयांचे चार बिऱ्हाडांचे एकत्रित घर आहे. यात सध्या दोन बिऱ्हाडे वास्तव्यास आहेत. यातील लवू कावले यांचे कुटुंब घरातच होते. १६ आॅगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक घरास आग लागली. घर कौलारू असल्याने वाशांनी पेट घेतला होता. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीच्या भडक्यात घर जळाले.
संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून कावले कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आल्याने गावातील ग्रामस्थांनी तातडीची मदत म्हणून छप्पर दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देत ह्यआधारह्ण दिला. याबाबत कावले कुटुंबीयांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
भाजपच्यावतीनेही तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक गणेश कुशे यांनी कावले यांना धान्य व जीवनावश्यक वस्तू सुपुर्द केल्या. शिवसेनेच्यावतीनेही मदत करण्यात आली. कावले कुटुंबीयांचे घर आगीत जळून खाक झाल्याने त्यांची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे त्यांना शासनाच्या मोठ्या मदतीची गरज आहे.