ग्रीन रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा, स्वाभिमान पक्षाच्या जिल्हाध्यक्षानी केली भूमिका स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 05:32 PM2017-12-07T17:32:30+5:302017-12-07T17:38:08+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील काही गावांमधील जमिनीवर ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. तेथील जनतेला विश्वासात न घेता हुकुमशाही करून कोणी हा प्रकल्प उभारु पहात असेल तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा त्याला तीव्र विरोध राहील. प्रकल्पग्रस्तांच्यावतीने उभारण्यात आलेल्या जनआंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा राहणार असून त्यांच्या लढ्यात आम्ही सक्रियपणे सहभागी होणार असल्याची भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी येथे स्पष्ट केली.
कणकवली : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील काही गावांमधील जमिनीवर ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. तेथील जनतेला विश्वासात न घेता हुकुमशाही करून कोणी हा प्रकल्प उभारु पहात असेल तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा त्याला तीव्र विरोध राहील. प्रकल्पग्रस्तांच्यावतीने उभारण्यात आलेल्या जनआंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा राहणार असून त्यांच्या लढ्यात आम्ही सक्रियपणे सहभागी होणार असल्याची भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी येथे स्पष्ट केली.
कणकवली येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत पुढे म्हणाले, ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे आंबा, काजू बागायतदार तसेच मच्छिमारांचे फार मोठे नुकसान होणार आहे. आरोग्यासाठीही हा प्रकल्प घातक ठरणार आहे. त्यामुळे या प्रदूषणकारी प्रकल्पाला जनतेबरोबरच आमचा विरोध रहाणार आहे.
हा प्रकल्प उभारण्याचे ठरविताना सत्ताधाऱ्यानी जनतेला विश्वासात घेतले पाहिजे होते. मात्र, तसे झालेले नाही. जनसुनावणी न घेता हा प्रकल्प उभारण्याचा केला जाणारा प्रयत्न अन्यायकारक आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही. जनतेच्या लढ्यात आम्ही सहभागी होणार आहोत.
कणकवली तसेच जिल्ह्यातील मुंबई - गोवा महामार्ग चौपदरिकरण प्रकल्पबाधिताना योग्य मोबदला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रकल्पबाधितांच्या न्याय हक्कासाठी आम्ही त्यांच्या बरोबरीने लढा देणार आहोत. ज्या प्रकल्पबाधितांवर अन्याय होत आहे त्यांनी पक्षाच्या कणकवली येथील कार्यालयात संपर्क साधावा . त्यांना त्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल.
महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने आपले निकृष्ट दर्जाचे काम लपविण्यासाठी सिंधुदर्गातील काही पुढाऱ्याना चारचाकी गाड्या भेट दिल्या आहेत. मात्र, या महामार्गाचे काम पारदर्शकपणेच झाले पाहिजे.अशी आमची भूमिका आहे.
नागरिकांना महामार्गावरील खड्डे तसेच अन्य कोणताही त्रास होता नये याची काळजी संबधित कंपनीने घ्यावी. या महामार्गाचे काम चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी यापुढे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते सातत्याने या कामावर लक्ष ठेवून रहाणार आहेत.
10 जानेवारी पूर्वी संपूर्ण महामार्गावर कारपेट करून तो सुस्थितित आणावा . अन्यथा आमच्या पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. संबधित कंपनीने ज्या पुढाऱ्याना चारचाकी गाड्या भेट दिल्या आहेत त्यांची नावे जनतेसमोर जाहिर करावीत. तसेच त्या पुढाऱ्याना गाड्या भेट देण्यापेक्षा त्याच पैशातून जनतेला त्रास होणार नाही असे रस्त्याचे काम करावे. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
जिल्ह्याचे पालकमंत्री निष्क्रिय असून त्याना कोणीही अधिकारी जुमानत नाही. त्यांच्या दौऱ्यात महसुलचे अधिकारी सहभागी होत नाहीत हे यावरून स्पष्ट होते. आंबोली येथे मृतदेह सापडायला लागल्यावर आपला बचाव करण्यासाठी तसेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी मालवण येथील रमेश गोवेकर प्रकरण उकरून काढले आहे.
जनतेची दिशाभूल करणाऱ्या पालकमंत्र्यानी त्यांच्यात हिम्मत असेल तर रमेश गोवेकर प्रकरणाचा छड़ा लावावा . ते जमले नाहीतर आपल्या मंत्री पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा. फक्त विविध योजनांच्या घोषणा करण्यापलिकडे ते काही करीत नाहीत. त्यांच्या दौऱ्याच्या वेळी कस्टमचा एक वॉचमन गेट उघडत नाही. याहून लज्जास्पद गोष्ट कोणतीही नाही. याचा त्यांनी विचार करावा.असेही दत्ता सामंत यावेळी म्हणाले.
परप्रांतीय मच्छिमारांसाठी पालकमंत्र्यांची किनारा भेट !
ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या स्थानिक मच्छीमार तसेच इतर लोकांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यानी समुद्र किनाऱ्यावरील गावांची भेट घेतलेली नाही. तर परप्रांतीय मच्छिमारांची व्यवस्था कशी आहे ? हे पहाण्यासाठी त्यांनी किनाऱ्याला भेट दिली. त्यांचे परराज्यात जास्त मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी ते सातत्याने जात असतात. त्याना स्थानिकांचे काही देणे घेणे नाही .अशी टिका सतीश सावंत यांनी यावेळी केली.