Maratha Reservation: सिंधुदुर्गात लाक्षणिक उपोषणांमधून जरांगे-पाटलांना पाठिंबा
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 2, 2023 05:09 PM2023-11-02T17:09:51+5:302023-11-02T17:10:44+5:30
सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय ...
सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण छेडले. या उपोषणात आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सुशांत नाईक, बाळा गावडे यांच्यासह बहुसंख्य मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. या उपोषणाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी राष्ट्रवादीचे भास्कर परब, नाझीर शेख, पुंडलिक दळवी उपस्थित होते.
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील सकल मराठा समाजाने एकजूट दाखवत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. गावातील देवळी, तेली व मुस्लिम समाजाने मराठा आंदोलकांची आंदोलनस्थळी भेट घेत आरक्षणाला जाहीर पाठिंबा दर्शविला.
दोडामार्गमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. तर सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे मराठा समाज बांधवांनी बाइक रॅली काढली होती. सावंतवाडीत भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.