सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयीन प्रक्रिया सरस : सुरेंद्र तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 02:59 PM2020-03-12T14:59:19+5:302020-03-12T15:01:21+5:30
मुंबई उच्च न्यायालयात काम करताना माझ्या निरीक्षणात या जिल्ह्यात न्यायसंस्थेत शिस्त असल्याचे पहायला मिळते. याचे श्रेय वकिलांसोबतच येथील न्यायसंस्थेलाही दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांनी केले.
कणकवली : महाराष्ट्राच्या तुलनेत सिंधुदुर्गचेन्यायालयीन प्रक्रियेत चित्र वेगळे आहे. येथील जनता आपल्या न्याय हक्कांसाठी जागृत असली तरी न्यायव्यवस्थेवर बोजा टाकत नाही. कोकणात दिवाणी व फौजदारी खटल्याचे प्रमाण कमी आहे. कारण, येथे त्रास देण्यासाठी बोगस खटले दाखल केले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला न्याय मिळाला पाहिले. यासाठी पक्षकार झटत असतो.
मुंबई उच्च न्यायालयात काम करताना माझ्या निरीक्षणात या जिल्ह्यात न्यायसंस्थेत शिस्त असल्याचे पहायला मिळते. याचे श्रेय वकिलांसोबतच येथील न्यायसंस्थेलाही दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांनी केले.
कणकवली तालुका वकील संघटनेच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते . यावेळी सीमादेवी तावडे, जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. कदम, कणकवली तालुका बार असोसिएशनचे अॅड. विद्याधर चिंदरकर, बार कौन्सिल सदस्य अॅड. संग्राम देसाई, आमदार नीतेश राणे, माजी आमदार विजय सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तावडे म्हणाले, माझे वडील न्या. पंढरीनाथ तावडे यांच्यासोबत मी मुंबईहून गावी आल्यानंतर कणकवलीतील प्राथमिक शाळा नं. ४ मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी निमणकर गुरुजी यांचा मी आवडता विद्यार्थी होतो. त्यांनी माझ्याकडून गणित, इतिहास विषय पाठ करून घेतानाच शिस्तीचेही धडे दिले. माझे आजोबा कडक शिस्तीचे असल्याने पूर्वानुभव होताच. त्यानंतर एस. एम. हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी आम्हांला शिक्षिका म्हणून लाभलेल्या बांदिवडेकर, अॅड. उमेश सावंत यांच्या आई अलका सावंत यांनी मला घडविले.
ती दिशा माझ्या आयुष्यासाठी मार्गदर्शक होती. सुरेंद्र पंढरीनाथ तावडे ही माझी ओळख शाळा नंबर ४ मध्येच झाली. शाळेत नाटकात मी स्त्री पात्र साकारले होते. माझे मित्र मला त्या भूमिकेच्या नावाने हाक मारत असत. मुंबईत रुपारेल महाविद्यालयात असतानाही १० नाटकात काम केले. तेथून मी माझ्या क्षेत्रात बदल केला. मात्र, वकील व न्यायाधीश या भूमिकेत बदल करताना मला फारसे वेगळे वाटले नाही. वकिली व्यवसाय व न्यायदान करण्याच्या परिश्रमात फरक निश्चित आहे.
कणकवलीवर माझे प्रेम आहे. कणकवलीत आल्यानंतर माझे मित्र सुनील नाडकर्णी, संजय पाध्ये, बाळा धुमाळे यांच्या दुकानात बसायचो. ते माझे वर्गमित्र आहेत. गेली ५० वर्षे आमची मैत्री आहे. माझ्या वडील, आजोबांनी ज्या ठिकाणी काम केले तेथे सत्कार स्वीकारणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे वाटले, असेही ते म्हणाले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. कदम, कणकवलीचे दिवाणी न्या. एस. ए. जमादार यांनीही मनोगत व्यक्त केले.
अॅड. विद्याधर चिंदरकर यांनी वकील संघटनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा सत्कार करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार मानले. प्रास्ताविकात अॅड. उमेश सावंत यांनी न्या. तावडे यांचा परिचय करून देताना न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना आम्ही सत्कार करणार असल्याची विनंती केली. त्यांनी होकार दिल्याने हा कार्यक्रम आज होत आहे, असे सांगितले. आभार अॅड. मनोज रावराणे यांनी मानले.