मालवण किनारपट्टीला लाटांचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 06:06 PM2019-06-15T18:06:18+5:302019-06-15T18:08:29+5:30
जोरदार वाऱ्यासह खवळलेल्या समुद्री लाटांच्या तडाख्यामुळे देवबाग गावात मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पडझड व नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. ख्रिश्चनवाडीत एका घरावर झाड कोसळून आई व मुलगा जखमी झाले. देवबाग संगम येथील जमीन समुद्राने गिळंकृत केली. तेथील शवदाहीनीही वाहून गेली आहे. किनारपट्टी भागात वीज खांब कोसळल्याने गावात दिवसभर वीजपुरवठा खंडित होता.
मालवण : जोरदार वाऱ्यासह खवळलेल्या समुद्री लाटांच्या तडाख्यामुळे देवबाग गावात मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पडझड व नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. ख्रिश्चनवाडीत एका घरावर झाड कोसळून आई व मुलगा जखमी झाले. देवबाग संगम येथील जमीन समुद्राने गिळंकृत केली. तेथील शवदाहीनीही वाहून गेली आहे. किनारपट्टी भागात वीज खांब कोसळल्याने गावात दिवसभर वीजपुरवठा खंडित होता.
अरबी समुद्रात घोंगावणारे वायू चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्याने सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सकाळी वारा व लाटांचा प्रभाव काहीसा कमी झाला. मात्र, सायंकाळी लाटांचा जोर वाढून पाणी पुन्हा किनारपट्टी भागात घुसले.
देवबाग ख्रिश्चनवाडी येथील किनारपट्टीलगत असलेल्या फेलीस फर्नांडिस यांच्या शौचालयाची टाकी कोसळून नुकसान झाले. तर लीना पर्रीकर यांच्या घरावर झाड कोसळले. त्यात घराचे लाकडी वासे कोसळून लीना व त्यांचा मुलगा जखमी झाला.
शालू लुद्रीक यांच्या घरात समुद्राचे पाणी घुसले. वेलांकणी मंदिराचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्री लाटांनी देवबाग स्मशानभूमी गिळंकृत केली. तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने बसविण्यात आलेला बायो टॉयलेट कोसळून त्याचे नुकसान झाले. रिचर्ड लुद्रीक यांच्याही शौचालयाचे नुकसान झाले आहे. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष आबा हडकर व अन्य ग्रामस्थांनी नुकसानीची पाहणी केली.
बोट व इंजिन तुटून नुकसान
देवबाग येथील आनंद परमेश्वर कुमठेकर यांची बोट किनाºयावर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली होती. मात्र, पाण्याची पातळी अधिकच वाढल्याने जोरदार लाटांच्या तडाख्यात बोट व इंजिन तुटून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
वीजखांब कोसळले; बत्ती गुल
देवबाग गावाला वीजपुरवठा करणारी मुख्य वीजवाहिनी किनाऱ्यावरून जाते. लाटांच्या तडाख्यात वीज खांब कोसळले. काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली. त्यामुळे वीजपुरवठा दिवसभर खंडित होता.
शिवसेनेकडून पाहणी
जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, ग्रामसेवक युवराज चव्हाण, पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर, मनोज खोबरेकर, ग्रामपंचायत सदस्य फिलसू फर्नांडिस, निहीता गावकर, नागेश चोपडेकर, रमेश कद्रेकर, जॅक्सन फर्नांडिस, आंनद तारी यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली.