शस्त्रक्रिया विभागाने घेतला दीड वर्षांनी ‘श्वास’
By admin | Published: November 30, 2015 12:32 AM2015-11-30T00:32:17+5:302015-11-30T01:06:46+5:30
सुरेश पांचाळ : मालवण ग्रामीण रुग्णालयातील बंद विभाग पुन्हा सुरु
मालवण : अपुरा डॉक्टर व कर्मचारी वर्ग, बंद रुग्णवाहिका अशा समस्यांच्या गर्तेतील मालवण ग्रामीण रुग्णालयातील गेली दीड वर्षे बंदावस्थेत असलेला शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणे या शस्त्रक्रिया विभागात गरीब व गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. डॉ. ज्ञानेश्वर सोडल व खासगी डॉक्टर अजित लिमये रुग्णांना सेवा देणार आहेत. २० नोव्हेंबरपासून नव्याने सुरु झालेल्या या विभागात १२ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पांचाळ यांनी दिली. शस्त्रक्रिया विभागातून विविध प्रकारच्या सर्व शस्त्रक्रिया तत्काळ केल्या जाणार आहेत. याचा लाभ गरीब, गरजू रुग्णांबरोबरच ज्येष्ठ नागरिक व बीपीएलधारक अशा सर्व रुग्णांना मिळणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णालयातील हा शस्त्रक्रिया विभाग दीड वर्षाहून अधिक कालावधीसाठी बंद होता. त्यानंतर रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्या प्रयत्नातून २० नोव्हेंबरला शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर आठ दिवसातच रुग्णांच्या विविध प्रकारच्या १२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर मोठी गैरसोय होते. शस्त्रक्रिया विभागही सुरु झाला आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संपूर्ण रुग्णालयाला विद्युत पुरवठा करणारा जम्बो जनरेटर गरजेचा आहे. याबाबत वरिष्ठांकडे मागणीही करण्यात आली आहे. गेली अनेक महिने नादुरुस्त असलेल्या रुग्णवाहिकेचा प्रश्नही निकाली लागावा अशी अपेक्षा डॉ. पांचाळ यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)