जीवरक्षकांच्याच जीवाला धोका

By admin | Published: May 9, 2017 11:47 PM2017-05-09T23:47:12+5:302017-05-09T23:47:12+5:30

जीवरक्षकांच्याच जीवाला धोका

The survival of the survivors is risk | जीवरक्षकांच्याच जीवाला धोका

जीवरक्षकांच्याच जीवाला धोका

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण : वायरी, तारकर्ली व देवबाग या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढले आहे. पर्यटकांना नेमण्यात आलेल्या जीवरक्षकांना न जुमानता पर्यटक अतिउत्साहीपणा दाखवून जीवरक्षकांशी अर्वाच्य भाषेत बोलत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जीवरक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पर्यटकांना रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात अशी मागणी पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर यांनी केली. जीवरक्षक ओळखता यावेत यासाठी त्यांना ओळखपत्र व ड्रेसकोड देण्यात आल्याचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘किल्ला विकणे आहे’ असे फलक लावून ऐतिहासिक अस्मितेची अवहेलना केल्याबद्दल निषेधाचा ठराव तर आचरा येथे जीवरक्षकांनी पर्यटकांना वाचविल्याबद्दल निधी मुणगेकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. तर सोनाली कोदे यांनी कोळंब पुलाला पर्यायी मार्ग असलेला कातवड-ओझर हा मार्ग खड्डेमय बनल्याने पावसाळ्यात धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती मनीषा वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली.
यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील, सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, सुनील घाडीगांवकर, राजू परुळेकर, अजिंक्य पाताडे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, सोनाली कोदे, सागरिका लाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी निधी मुणगेकर यांनी वायंगणी बौद्धवाडी येथील सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा करण्याची मागणी केली तर आचरा हिर्लेवाडी ते वायंगणी गावासाठी मंजूर झालेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रस्ता कामाची तत्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना केली. या मार्गावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. तर मधुरा चोपडेकर यांनी पावसाळ्यात देवबागला उधाणाचा फटका बसतो. प्रशासनाकडून त्यांना स्थलांतराच्या नोटीसा बजावण्यात येतात. मात्र, उधाणाचे पाणी रोखण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे सांगितले.
राजू परुळेकर यांनी बीएसएनएलच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेली गटारे नष्ट केली आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांनी बनविलेले चांगले रस्ते पावसाळ्यात वाहून जाण्याच्या स्थितीत आहेत.
यावर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी ठेकेदाराला सूचना करून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तर मठबुद्रुक गावाला गेली १५ वर्षे आरोग्य सेवक नाही. गावाला आरोग्य सेवक न मिळाल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा परुळेकर यांनी दिला.
मासिक सभेचे निमंत्रण ‘ईमेल’वर
मासिक सभेची तारीख संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळेत मिळत नसल्याने सभेला उपस्थिती दर्शवू शकत नाही, अशी ओरड मारणाऱ्या विभागासाठी पंचायत समिती प्रशासनाने यापुढे बैठका, सभा आदींचे नियोजन संबंधित विभागाच्या "इमेल"वर पाठविण्याची पद्धत अवलंबविण्यात येईल, असे गटविकास अधिकारी अविनाश पराडकर यांनी स्पष्ट केले.
एसटी प्रशासनावर ताशेरे
उपसभापती अशोक बागवे यांनी एसटी प्रशासनावर हल्लाबोल चढविला. आचरा येथील वाहतूक नियंत्रक कार्यालय बंद आहे. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तसेच बांदिवडे पुलावरून मसुरे आचरा बसफेरी तत्काळ सुरू करा. कोणतेही कारणे न देता बसफेरी व प्रवाशांना सेवा द्या, असे आवाहन बागवे यांनी केले.
ग्रामसेवकांचा मनमानी कारभार
शिरवंडे मतदारसंघात टॉवर उभारणीसाठी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ, कार्यवाही केव्हा केली जाईल, असे सुनील घाडीगांवकर यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना विचारले. तालुक्यातील काही गावात ग्रामसेवक मनमानी करत असल्याचा आरोपही घाडीगांवकर यांनी केला.
ग्रामसेवक केव्हा येतात, केव्हा जातात याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली. तर पावसाळ्यात सर्व ग्रामपंचायतींना वीजरोधक उपाययोजना करण्याच्या सूचना कराव्यात असेही घाडीगांवकर यांनी सांगितले.

Web Title: The survival of the survivors is risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.