पाण्याच्या टाकीत आढळल्या जिवंत नानेट्या: ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 05:24 PM2020-02-27T17:24:01+5:302020-02-27T17:25:20+5:30
सावंतवाडी तालुक्यातील दांडेली येथील आरोसकरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये तब्बल पाच जिवंत नानेट्या आढळल्या. पाण्यामध्येही काही अस्वच्छ बाबी आढळून येत असल्याने ही पाहणी करण्यात आली. यावेळी हा प्रकार समोर आला.
सावंतवाडी : तालुक्यातील दांडेली येथील आरोसकरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये तब्बल पाच जिवंत नानेट्या आढळल्या. पाण्यामध्येही काही अस्वच्छ बाबी आढळून येत असल्याने ही पाहणी करण्यात आली. यावेळी हा प्रकार समोर आला.
याबाबत चार दिवसांपूर्वी महिलांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पाण्यास विचित्र वास येत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावेळी कुठचीही कार्यवाही झाली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. आरोस-दांडेली गावात नळपाणी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होतो. मात्र, आरोसकरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची उन्हाळ््यात टंचाई भासू नये म्हणून अलीकडेच नळपाणी योजनेबरोबरच विहीर खोल करून पंपाद्वारे वस्तीतील टाकीत पाणी सोडण्यात येण्याची योजना तयार करण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून नळपाणी योजना व विहिरीतील पंपातून टाकीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आरोसकरवाडीतील ग्रामस्थांनी महिलांच्या सांगण्यानुसार गेले १० ते १२ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याला वेगळा वास येत असल्याचे ग्रामपंचायतीतील संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला कळविले होते. मात्र, तेव्हा याकडे पाण्यात बेडूक मृत झाला असल्याचे सांगत दुर्लक्ष करण्यात आले.
मात्र, मंगळवारी वाडीतील मोहिनी आरोसकर यांनी नळाला पाणी आल्यावर पाहणी केली असता या पाण्यामध्ये मृत छोट्या माश्याही सापडल्या. यावेळी त्यांनी वाडीतील सर्व ग्रामस्थांना कल्पना दिल्यावर ग्रामस्थांनी टाकीवर चढून आत वाकून पाहिल. त्यावेळी तब्बल पाच जिवंत नानेट्या आढळून आल्या.
यावेळी संतप्त ग्रामस्थांनी थेट सरपंच स्मिता मोरजकर यांच्या घरी जाऊन या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन या प्रकाराची शहानिशा केली असता टाकीमध्ये जिवंत नानेट्या असल्याची खात्री पटली.
ग्रामसेवक वीणा धुरी यांना याबाबत विचारले असता त्यांनी विहिरीमध्ये जी फळे पडतात ती कुजून पंपाच्या पाण्याद्वारे या टाकीत येत आहेत. त्यामुळे पाण्याला वास येत असेल, असे उत्तर ग्रामस्थांना दिले.
सरपंच मोरजकर यांनी टाकीतील पाणी काढून टाकी साफ करण्यात येईल, असे सांगितले. उपसरपंच योगेश नाईक यांनी या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येईल असे सांगितले.
ग्रामपंचायतीकडून दखल
मंगळवारी सकाळी ग्रामपंचायतीकडून विहिरीमध्ये वाढलेली झाडी तसेच पालापाचोळा बाहेर काढून ती स्वच्छ करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मेघशाम नाईक, विजय नाईक, गजानन नाईक व ग्रामस्थ भूषण आरोसकर, रमाकांत आरोसकर यांनी पाण्याची टाकी पूर्ण स्वच्छ केली. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून विहिरीवर लवकरच लोखंडी जाळी बसविणार असल्याचे आश्वासन उपसरपंच नाईक यांनी दिले.
आमच्या वस्तीत मोजकीच पाणीपुरवठा करणारी माध्यमे आहेत. पाण्याद्वारे रोगराई, आजार लवकरच पसरतात. मंगळवारी येथील टाकीमध्ये पाच जिवंत नानेट्या आढळल्या. तसेच नळातून आलेल्या पाण्यामध्ये माश्या आढळल्या आहेत. हे धोकादायक ठरू शकते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ रेवती आरोसकर यांनी दिली.