सुशांत खिल्लारे खून प्रकरण: पार्टीत बसले अन् खिल्लारेला संपवले; सांगली, सातारा जिल्ह्यांतून पाच जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:25 PM2023-02-07T12:25:24+5:302023-02-07T12:25:51+5:30
आर्थिक देवघेवीतून सुशांत खिल्लारे याच्या खून
सावंतवाडी : आर्थिक देवघेवीतून आंबोली घाटात घडलेल्या सुशांत खिल्लारे याच्या खून प्रकरणात आणखी पाच जणांचा सहभाग असल्याचे संशयित तुषार पवार याच्या चौकशीत पुढे आले. त्यानंतर यातील पाचही जणांना सांगली व सातारा जिल्ह्यातून सावंतवाडी पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. पार्टीच्या वेळी आपल्याकडून झालेल्या मारहाणीत त्याचा खून झाला, अशी कबुली पवार याने पोलिसांसमोर दिली. मात्र, मृतदेह घाटात टाकताना हे पाच जण नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या पाच जणांमध्ये आबासो ऊर्फ अभय बाबासो पाटील (३८ रा. वाळवा, सांगली), प्रवीण विजय बळीवंत (२४, रा. वाळवा, सांगली), राहुल कमलाकर माने (२३, रा. कराड, सातारा), स्वानंद भारत पाटील (३१, रा. इस्लामपूर, सांगली), राहुल बाळासाहेब पाटील (३१, रा. वाळवा, सांगली) यांचा समावेश आहे.
या सर्वांना ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आंबोली घाटात खिल्लारे याच्या खून प्रकरणात आणखी काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर तपासाची सूत्रे पोलिस उपअधीक्षक यांनी फिरविण्यास सुरुवात केली.
यात अटकेत असलेला तुषार पवार याची कसून चौकशी केली. आम्ही आर्थिक देवघेवीतून कामगार पुरवणारा मुकादम असलेल्या खिल्लारे याचे अपहरण केले. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी आपण सर्व पार्टी करण्यासाठी बसलो. यावेळी त्याला सर्वांनी मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यावेळी आणखी पाच जण भाउसो माने व आपण मिळून आणखी सहा जण होते, असे त्याने सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
याबाबत उपविभागीय अधिकारी सोळंके म्हणाल्या की, या प्रकरणात आम्ही संशयित पवार याची कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर काही गोपनीय व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील चौकशी करण्यात आली. यात काही सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या सर्व चौकशीत या प्रकरणात आणखी पाच जणांचा थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.