सुशील वेल्हाळ यांचे निधन
By admin | Published: February 10, 2016 10:20 PM2016-02-10T22:20:53+5:302016-02-11T00:36:28+5:30
हृदयविकाराचा झटका : सर्वसामान्यांचा नेता हरपला
शृंगारतळी : सर्वसामान्य लोकांसाठी अहोरात्र झटणारा सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या सुशील तथा आप्पा वेल्हाळ यांचे मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ठाणे येथून घरी परतत असताना प्रवासातच चिपळूण तालुक्यातील घोणसरे येथे त्यांची प्राणज्योत मालवली. आठवडाभरापूर्वी म्हणजेच दोन फेब्रुवारीला त्यांनी आपला ६५ वा वाढदिवस साजरा केला होता.त्यांच्या अचानक जाण्याने सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता हरपला असल्याची जनभावना निर्माण झाली आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बाजारपेठ व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वी पत्नी सुचिता वेल्हाळ यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते ठाणे येथे गेले होते. तपासणीनंतर श्रीवर्धन येथे आपल्या सासरवाडीत पत्नीला सोडून रात्री शृंगारतळीकडे घरी परत येत होते. रात्री वाहन चालविण्यास त्रास होत असल्याने त्यांनी शृंगारतळी येथून पाटपन्हाळे महाविद्यालयातील कर्मचारी संदीप चव्हाण यांना बोलावून घेतले होते. संदीप चव्हाण यांची लोणावळयात भेट झाली. सुशील वेल्हाळ यांनी पत्नी सुचिता यांना दूरध्वनी करून ‘आता काळजी करू नको, संदीप आला आहे,’ असे सांगितले व पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
पहाटे गणेशखिंड तांबी येथे वेल्हाळ यांना पहिला झटका आला. त्यांना आपल्या छातीत तीव्र वेदना होत असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी घोणसरे येथील मित्र नंदू गोंधळी यांना फोन करून कल्पना दिली. घोणसरे येथे आल्यानंतर एका खासगी रुग्णालयात स्वत: चालत गेले. त्याठिकाणी बाथरुमला गेले व परत येऊन स्ट्रेचरवर झोपताच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची खबर पोहोचताच अनेकजणांनी घोणसरे गाठले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना मार्गताम्हाणे येथे शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटनासाठी आले होते. कार्यक्रम संपवून जाताना त्यांनी अचानक चालकाला गाडी सुशील वेल्हाळ यांच्या घराकडे वळविण्यास सांगितले व घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे, गोविंदराव निकम, आदी राजकीय पुढाऱ्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते.
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील वरिष्ठ महाविद्यालयात उपाध्यक्ष म्हणून नुकतीच जबाबदारी स्वीकारली होती. महाविद्यालयात विशेष कामगिरी करण्याचे स्वप्न त्यांच्या अचानक जाण्याने मागे पडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गौरव, अवधूत, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी शेकडोंचा जनसमुदाय लोटला होता. सकाळच्या सत्रात शृंगारतळी बाजारपेठेत अक्षरश: पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती. इतक्या मोठ्या संख्येने लोक ‘आप्पां’ना निरोप देण्यासाठी आले होते. (वार्ताहर)
शरद पवार आज शृंगारतळीत
सुशील वेल्हाळ यांच्या निधनाचे वृत्त कळल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष
शरद पवार आज, गुरुवारी
सकाळी शृंगारतळीमध्ये दाखल
होणार आहेत.
मुंबई येथून हॅलिकॉप्टरने सकाळी दहा वाजता दाभोळ वीज कंपनी येथे दाखल होतील. यानंतर १०.१५ वाजता शृंगारतळी येथील सुशील वेल्हाळ यांच्या निवासस्थानी भेट देतील.
तेथून ते गुहागरचे माजी सभापती नंदकिशोर पवार यांच्या निवासस्थानी भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी चिपळूणमध्ये जाणार आहेत .