Sindhudurg: मित्राच्या खून प्रकरणी संशयितास दोन दिवसांची पोलिस कोठडी

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 23, 2024 06:38 PM2024-05-23T18:38:48+5:302024-05-23T18:39:13+5:30

खुनात आणखी काहींचा सहभाग असण्याचीही दाट शक्यता ?

Suspect in friend murder case remanded to police custody for two days in Sindhudurg | Sindhudurg: मित्राच्या खून प्रकरणी संशयितास दोन दिवसांची पोलिस कोठडी

Sindhudurg: मित्राच्या खून प्रकरणी संशयितास दोन दिवसांची पोलिस कोठडी

वैभव साळकर

दोडामार्ग : दारूच्या नशेत आईवरून शिवी दिल्याने रागाने लाकडी बेंचच्या रिपने डोक्यावर प्रहार करून अमर देशमाने याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला त्याचाच मित्र संशयित आरोपी समीर पेडणेकर याला दोडामार्ग पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी अमर, समीर व इतर अन्य दोघेजण अशा चौघांनी हमालीचे काम केले होते. मात्र, त्या हमालीच्या पैशावरून या चौघांत टोकाचे वाद झाले होते. त्यामुळे अमरच्या खुनात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा उलगडा पोलिस तपासात होण्याची शक्यता आहे.

साटेली-भेडशी येथील वामन संकुलात खून झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. अमर देशमाने याचा त्याचाच मित्र समीर पेडणेकर याने खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली असता त्याने खुनाची कबुली दिली. आम्ही दोघांनी एकत्र दारू प्याली. मी स्वतः त्याला ती दिली, वर पैसेही दिले. मात्र, तरीदेखील त्याने मला आईवरून शिवीगाळ केली. ते असह्य न झाल्याने आपण त्याच्या डोक्यावर लाकडी बेंचची रिप मारली असे त्याने सांगितले होते. या खुनाच्या प्रकारामुळे साटेली - भेडशीसह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

हमालीच्या पैशांवरून झाले होते वाद

मृत अमर, संशयित आरोपी समीर व त्यांचे अन्य दोघे मित्र असे चौघेजण मिळून त्यांनी काही दिवसांपूर्वी हमालीचे काम केले होते. मोबाइल टॉवरचे पाइप उतरविण्याचे ते काम होते. त्यातून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरून त्या चौघांमध्येही वाद झाले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे अमरचा खून पैशांच्या वाटणीवरून झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे असल्यास समीर खुनाचे देत असलेले कारण खोटे असू शकते आणि या खुनात आणखी काहींचा सहभाग असू शकतो. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करण्याची गरज आहे.

Web Title: Suspect in friend murder case remanded to police custody for two days in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.